esakal | नवीन पंधरा आरोग्य केंद्र अन् ११५ उपकेंद्र द्या, लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची आरोग्यमंत्र्यांकडे साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

42rajesh_20tope_19

लातूर  जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता ग्रामीण भागात दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ११५ उपकेंद्रे मंजूर करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

नवीन पंधरा आरोग्य केंद्र अन् ११५ उपकेंद्र द्या, लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची आरोग्यमंत्र्यांकडे साकडे

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता ग्रामीण भागात दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ११५ उपकेंद्रे मंजूर करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. यासह अन्य मागण्यांबाबत श्री. टोपे सकारात्मक असल्याची माहिती श्री. केंद्रे यांनी दिली.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांच्या प्रश्नांबाबत केंद्रे यांनी नुकतीच मुंबईत टोपे यांची भेट घेतली. ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर नागलगाव व येरोळ येथे नवीन आरोग्य केंद्र मंजूर करावे.

सहाशे सार्वजनिक विहिरींना मंजुरी, अन् टंचाईमुक्ती ! लातूरातील अनोखा पॅटर्न 

यासोबत मंगरूळ (ता. जळकोट) येथे नवीन आरोग्य केंद्र मंजूर झाल्याचे सांगून जिल्ह्यात आणखी नवीन १५ आरोग्य केंद्र व ११५ उपकेंद्रांची गरज असल्याचे केंद्रे यांनी श्री. टोपे यांच्या निदर्शनास आणून दिले. यासोबत आरोग्य केंद्रांतील रिक्त आठ वैद्यकीय अधिकारी व ३१४ कर्मचाऱ्यांची पदेही तातडीने भरण्याची मागणी त्यांनी केली. दोन्ही मागण्यांबाबत टोपे सकारात्मक असून त्यांनी श्री. केंद्रे यांच्या पाठपुराव्याचे व तळमळीचे कौतुक केले. नागलगाव, औराद शहाजानी व येरोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी टोपे यांनी आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांना निर्देश दिले. यावेळी दगडू साळुंके, बापूराव राठोड व भास्कर पाटील उपस्थित होते.

प्रस्तावित नवीन आरोग्य केंद्र
एकुरगा (ता. लातूर), खंडाळी- नांदुरा (ता. अहमदपूर), उजळंब आणि शेळगाव (ता. चाकूर), मंगरूळ आणि घोणसी (ता. जळकोट), अनसरवाडा आणि शेडोळ (ता. निलंगा), जवळगा व दवण हिप्परगा (ता. देवणी), आलमला आणि एखंडी सारोळा (ता. औसा), हिप्पळगाव (ता. शिरूर अनंतपाळ) व कौळखेड (ता. उदगीर) येथे नवीन आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केंद्रे यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना दिला आहे. लवकरच या मागणीवर कार्यवाही होण्याची आशा केंद्रे यांना आहे.

संपादन - गणेश पिटेकर