esakal | कृषी संशोधनात बदनापूरची पुन्हा 'बाजी'; गोदावरीने तुरीच्या 'मर' अन् 'वांझ' रोगावर केली मात
sakal

बोलून बातमी शोधा

बदनापूर बातमी.jpg

तुरीच्या गोदावरी वाणास मिळाली मान्यता. 

कृषी संशोधनात बदनापूरची पुन्हा 'बाजी'; गोदावरीने तुरीच्या 'मर' अन् 'वांझ' रोगावर केली मात

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (जालना) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापूर कृषी संशोधन केंद्र वाण विकसित करण्यात अग्रेसर होत आहे. केंद्राने संशोधित केलेल्या तुरीच्या आणखी एका 'बीडीएन' २०१३ - ४१ या ‘गोदावरी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाणाची महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. हा वाण भारी जमिनीतील मर आणि वांझ रोगास प्रतिबंधात्मक आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

बदनापूर कृषी संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांना फायदेशीर वाण प्रसारित करण्याकडे कायम ओढा असतो. अकोला कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ४८ व्या जॉईन्ट अग्रेस्को परिषदेत या केंद्राच्या वतीने विकसित झालेल्या तूर पिकाच्या 'बीडीएन २०१३ - ४१' अर्थात गोदावरी या वाणास राज्यात खरीप हंगामात लागवड करण्यासाठी शिफारस करण्यास मान्यता मिळाली आहे. बदनापूर कृषी संशोधन केंद्राच्या या यशासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण आणि संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचे भक्कम पाठबळ आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा लाभला. शिवाय प्रा. डॉ. विष्णू गिते यांचेही मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती कडधान्य पैदासकार डॉ. दीपक पाटील यांनी दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या वाणाचे वैशिष्ट्ये अशी हा वाण मध्यम कालावधीत म्हणजे १६० ते १६५ दिवसांत तयार होतो. हा वाण मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक आहे. या वाणाच्या दाण्याचा रंग पांढरा आहे. शंभर दाण्याचे वजन ११.० ग्रॅम आहे. तुरीचे उत्पादन साधारण हेक्टरी १ हजार ९५० ते २ हजार ४५० किलो होते. या वाणाची लागवडीसाठी महाराष्ट्र राज्याची शिफारस आहे. भारी जमिनीत हा वाण शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची तूर उत्पादनात वाढ होईल. यापूर्वी बदनापूर केंद्राचा 'बीडीएन २' पांढऱ्या रंगाचा वाण होता. तो मर रोगास बळी पडत होता त्यामुळे अनेकदा ऐन बहरात आलेल्या उत्पादनात काही प्रमाणात घट दिसून येत होती, ही बाब आमच्या लक्षात आल्याने यावर सखोल संशोधन करून काही प्रमाणात होणारी उत्पादनातील घट कमी करण्यास कशी मदत होईल, असा अभ्यास केला. अर्थात 'बीडीएन २' हा मुळात उत्पादनक्षम वाण आहेच, फक्त पुढील धोके संशोधन करत असे दूर होतील हा हेतू डोळ्यासमोर ठेवत वर्ष २०१० पासून आम्ही कामाला लागलो आणि हे यश अखंड १० वर्षाच्या कठीण तपश्चर्येनंतर मिळाले, असे डॉ. दीपक पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आपण 'बीडीएन ७११' हा वाण खास कोरडवाहू शेती पद्धती डोळ्यासमोर ठेवून निर्माण केला होता.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र हा नवीन वाण काहीसा सिंचन पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केला. या वाणाचा कालावधी 'बीडीएन ७११' पेक्षा १० ते १५ दिवस अधिक आहे. हा वाण तयार होण्यास १६५ दिवस लागणार आहेत. म्हणजे तोच कालावधी 'बिडीएन २' या वाणाचा होता. याचे प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे तूर पिकावर येणारा मर रोग यासाठी हा नवीन वाण प्रतिबंधक आहे. म्हणजे हा वाण 'बिडीएन ग्रुप' मधील जरी असला तरी वैशिष्ट्ये ही 'बीएसएमएआर ग्रुप' प्रमाणे आहे. त्यामुळे हा वाण शेतकऱ्याच्या शेतावर उत्पादनाचा चढता आलेख निश्चित ठेवेल, असा विश्वास आहे. अर्थात या वाणाची पेरणी शेतकरी बांधवांनी एका पाण्याची हमखास सोय असेल अशाच क्षेत्रात करावी आणि कोरडवाहू करायची असेल तर हमखास भारी जमिनीतच करावी. या वाणाची फुले पिवळसर पांढरी आहेत. येत्या खरिपात शेतकऱ्यांना हा वाण काही प्रमाणात उपलब्ध होईल असेही शेवटी डॉ. पाटील यांनी सांगितले. 
 

(संपादन-प्रताप अवचार)