गुड न्यूज : जळकोटचे कोविड सेंटर रिकामे, कोरोनातून झाले बरे सर्व! 

शिवशंकर काळे 
Friday, 9 October 2020

आता जळकोटच्या कोविड सेंटरमध्ये नाही एकही रुग्ण 

जळकोट (जि. लातूर) : आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे सर्व कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तालुक्यातील गव्हाण येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्ण हळूहळू वाढू लागले होते. तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ३३९ पोचली होती. त्यापैकी २९६ रुग्ण २ ऑक्टोबरपर्यंत बरे झाले. ३३ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांच्यावर यशस्‍वी उपचार झाल्यानंतर त्यांना बुधवारी (ता. सात) सुटी देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पाटोदा बुद्रूक (ता. जळकोट) येथे कोरोनाचा संसर्ग वाढला होता. या गावात बाधितांची संख्या ७२ वर पोचली होती. तातडीने उपचार झाल्याने नव्वद टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या गावातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत झाली. दरम्यान, तालुक्यात आतापर्यंत एकूण ३३९ बाधितांची नोंद झाली होती. यातील २९६ जण २ ऑक्टोबरपर्यंत बरे झाले. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ ३३ रुग्णांवर उपचार सुरू होते. सात जण होम आयसोलेशेनमध्ये होते. १४ गंभीर रुग्णांवर उदगीर, लातूर या ठिकाणी उपचार चालू आहेत. कोविड सेंटरमध्ये बारा जणांवर उपचार चालू होता. बुधवारी हे रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे सेंटरमध्ये एकही रुग्ण राहिला नसल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी एस. व्ही. पवार यांनी दिली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आरोग्य कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावांत वेळोवेळी जनजागृती केली; तसेच कोरोना बाधितांना वेळेत उपचार झाल्याने कोरोनावर मात करता आली. नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेचे पालन केल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. सध्या जळकोट येथील कोरोना सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. नागरिकांनी यापुढे आरोग्य विभागाला सहकार्य करावे. 
- जगदीश सूर्यवंशी, अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, जळकोट. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News Jakot Covid Center empty