esakal | विक्री केलेल्या मालाचेही पैसे वेळेवर मिळेना; जिंतूरचे शेतकरी अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

जिंतूर शेतकरी आर्थीक संकटात

विक्री केलेल्या मालाचेही पैसे वेळेवर मिळेनात; जिंतूरचे शेतकरी अडचणीत

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : खरिप हंगाम जवळ आलातरी वित्तीय संस्थाकडून पीक कर्ज मिळेना, विक्री केलेल्या शेतमालाचेही पैसे आडत व्यापाऱ्यांकडून वेळेवर मिळेनात, त्यामुळे अगोदरच लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.

शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यावर शहरातील आडत व्यापारी १५ ते २० दिवसांनी शेतमालाचे पैसे देत असल्यामुळे खरिपाची पेरणी तोंडावर आली असताना व्यापारी अडवणूक करत असल्याबद्दल अनेक शेतकरी तक्रारी करत आहेत. तालुक्यात मागील वर्षीच्या अतिवृष्टीत व त्यानंतरच्या परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेली खरिप पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली. निसर्गाने साथ दिल्यामुळे त्यातून बऱ्यापैकी उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरात पडले. परंतु सततच्या लॉकडाऊनमूळे बाजारात शेतमालाची कवडीमोल भावाने विक्री करावी लागत असताना शहरातील आडत व्यापारी विक्री केलेल्या मालाचे पैसे वेळेवर देत नसल्याने त्यांची अडचण होत आहे.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

सध्या खरिपाच्या पेरणीसाठी बी- बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. परंतु विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे खरेदीदार व्यापाऱ्यांकडून वेळेवर मिळत नसल्यामुळे पीक उत्पादकांचे खरिपाच्या लागवडीचे नियोजन बिघडत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडल्याचे दिसत आहे.

वास्तविक शेतकऱ्यांनी शेतमाल बाजार समितीच्या आवारात विक्री केलेल्या शेतमालाचे चोवीस तासात शेतमालाचे पैसे देणे व्यापाऱ्यास बंधनकारक असताना आडत व्यापारी बाजार समितीच्या नियमाला हरताळ फासण्याचे काम करत असल्याचे यावरुन दिसते.

येथे क्लिक करा - देशभरातील १२ प्रमुख विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

परवानाधारक आडत व्यापाऱ्याकडे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री केल्यावर कोणत्याही प्रकारची आडत किंवा कमिशन विक्रीदाराकडून बाजार समितीच्या खरेदी विक्री विकास व १९६३ व १९६७ च्या नियमानुसार कमिशन घेण्याचा आडत व्यापाऱ्यास अधिकार नाही. मात्र बाजार समितीच्या आवारातील काही व्यापारी कच्च्या पावत्याद्वारे कमिशन कपात करत असल्याबद्दल शेतकरी सांगत आहेत. परंतु कांही कारणास्तव तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने मध्यम व गरीब शेतकऱ्यांची गोची होत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीच्या आवारात विक्री केल्यानंतरही त्यांना वेळेवर पैसे मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे लेखी तक्रार करावी.

- सतीश काळे, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, जिंतूर.

संपादन- प्रल्हाद कांबळे