Gram Panchayat Election: माखलेल्या गुलालातही चिंता 'आरक्षणाची'

जलील पठाण
Wednesday, 20 January 2021

निवडून तर आलो खरे पण सारपंचपदाची खुर्ची कोणाकडे असणार हे अद्यापि स्पष्ट नसल्याने सारपंचपदाच्या गप्पा आता चौकाचौकात रंगताना दिसत आहेत

औसा (लातूर): औसा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला. यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत गावकारभराची सूत्रे तरुण आणि नव्या चेहऱ्यांकडे सोपविली. सोमवारी गुलालाने माखलेले चेहरे मात्र सारपंचपदाच्या अरक्षणाच्या चिंतेत दिसत आहेत.

निवडून तर आलो खरे पण सारपंचपदाची खुर्ची कोणाकडे असणार हे अद्यापि स्पष्ट नसल्याने सारपंचपदाच्या गप्पा आता चौकाचौकात रंगताना दिसत आहेत. या चर्चेमध्ये आता आमच्याच पक्षाच्या ग्रामपंचायती जास्त कशा आल्या हे सांगण्याची घाई अनेकांना झाल्याचेही दिसत आहे.१८जानेवारी रोजी औसातालुक्यातील प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ४५ ग्रामपंचायतीची मतमोजणी येथील प्रशासकीय इमारतीत सकाळी दहा वाजता सुरू झाली. कामालपूर ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध आलेली होती.

सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकर - कारचा भीषण अपघात | eSakal

सोमवारी दिवसभर गावागावात जल्लोष आणि गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. मात्र गुलालाने माखलेल्या चेहऱ्यावर सरपंचपदाच्या आरक्षणाची चिंता अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. निघणारे आरक्षण कोणाच्या गळ्यात सारपंचपदाची माळ टाकेल यावर आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. ज्या पद्धतीने विजय आपलाच म्हटले जात होते त्याच पद्धतीने आता अरक्षणाच्या सोडतीतही विजय आपलाच असा अजब आणि अतिआत्मविशासाने दावे केले जात आहेत. अजून आरक्षण सोडत दूर असली तरी 'भावी सरपंच' असं कोणी चेष्टेने म्हटले तरी सारपंचपदाची जाणीवही कांहीना मोहरून टाकत आहे.

मतदारातली लढाई तर आपल्या हातात होती ती जिंकली मात्र आरक्षण हातात नसल्याने अनेकांनी अरक्षणासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थाना थेट निधी येत असल्याने सरपंचपद मानाचे आणि मिळकतीचे बनत आहे. त्यामुळे सरपंचपदाची खुर्ची अनेकांना भुरळ पाडत आहे. मतदारांनी निवडून दिलेल्या उमेदवाराला आरक्षण सोडतीने अजून लांबच ठेवल्याचे दिसत आहे.

वाळूजमध्ये चार वाहनांचा विचित्र अपघात, रिक्षाचा चुराडा

जेवढी उत्सुकता निवडून येण्यात होती त्यापेक्षा जास्त आता आरक्षण सोडतीची प्रत्येक निवडून आलेल्या सदस्याला लागली आहे. ज्या उमेदवारला बळजबरीने उभे करून निवडून आणले आता त्यालाही सारपंचपदाची स्वप्ने पडू लागली आहेत.

...आमच्याच पक्षाच्या जास्त ग्रामपंचायती...
निवडणुकीचे निकाल लागल्यावर सगळीकडे अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अमुक गावाचा अमका कार्यकर्ता निवडून आला. त्यामुळे त्या गावात आमच्याच पक्षाचे वारे आहे. त्यामुळे पन्नास टक्के तर कोणी ऐंशी टक्के ग्रामपंचायतीवर आमच्याच पक्षाचा झेंडा असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून देण्यास सुरुवात केली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election reservation news ausa latur political news