वाळूजमध्ये चार वाहनांचा विचित्र अपघात, रिक्षाचा चुराडा

रामराव भराड
Wednesday, 20 January 2021

या अपघातात रिक्षामधील सर्व पाचही जण जखमी झाले. त्यातील एक मुलगा व एक पुरुष असे दोन जण गंभीर जखमी आहेत

वाळूज (औरंगाबाद): भरधाव पिकअप, रिक्षा व दोन दुचाकी अशा चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात रिक्षामधील पाचजण जखमी झाले. सुदैवाने दुचाकीस्वार बालंबाल बचावले. अपघात होताच संतप्त जमावाने पिकअपचालकाला बेदम चोप दिला. यात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी (ता.१९) रात्री दहाच्या सुमारास लांझी चौकात घडली.

रामेश्वर भगवान डांगे (वय ३८, रा. राजूर गणपती) हे कुटुंबासह वाळूजजवळील नायगाव बकवालनगर येथे राहतात. रामेश्वर डांगे हे रिक्षाचालक असून मंगळवारी (ता.१९) ते कुटुंबासह जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते.

मोबाईलवरुन मिळणार अपघातप्रवण स्थळाची माहिती, पोलिसांनी बनवले ‘सेफ ड्राईव्ह’ अॅप

जेवण करून रामेश्वर डांगे (३८), त्यांचा साडू सोमेश दिनकर हेलपाडकर (३०), पत्नी सुवर्णा रामेश्वर डांगे (३०), आदित्य रामेश्वर डांगे (६) व करण रामेश्वर डांगे (१३) असे सर्वजण रिक्षामधून वाळूजमार्गे नायगाव-बकवालनगरकडे जात होते. त्यांची रिक्षा वाळूज येथील लांझी चौकात येताच पाठीमागून भरधाव आलेल्या पिकअप (एमएच-२६, एडी-९८७६) च्या चालकाने डांगे यांच्या रिक्षाला तसेच अन्य दोन दुचाकींना जोराची धडक दिली.

या अपघातात रिक्षामधील सर्व पाचही जण जखमी झाले. त्यातील एक मुलगा व एक पुरुष असे दोन जण गंभीर जखमी आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, पिकअपचालक नशेत होता. अपघात घडताच चौकात असलेल्या नागरिकांनी पिकअपचालकास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच वाळूज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल कंकाळ, पोलिस हेडकॉन्स्टेबल शेख सलीम, एन. एम. मालोदे, पंकज पाटील आदींनी तत्काळ हस्तक्षेप करून संतप्त जमावाच्या तावडीतून त्या चालकाची सुटका केली.

आपची महाराष्ट्रात एन्ट्री; लातूरच्या दापक्याळमध्ये मिळविली सत्ता, अरविंद केजरीवालांनी मराठीत दिल्या शुभेच्छा

त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर पोलिस उशिरा आले असते तर मॉब लिचिंग होऊन चालकाचे प्राण धोक्यात आले असते. अपघातानंतर वाळूज पोलिसांनी जखमी पाचही जणांना घाटीत उपचारार्थ दाखल केले. दोन्ही दुचाकीस्वारांनी दुचाकी सोडून पळ काढल्याने ते बालंबाल बचावले.

(edited by-pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waluj accident news aurangabad 4 people injured pick up and rickshaw