esakal | आरक्षणामुळे उदगीरमधील राजकीय हालचालीचा वेग मंदावला
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat

तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. अशातच आरक्षणाची सोडत रद्द झाल्याने राजकीय हालचालींचा वेग मंदावण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

आरक्षणामुळे उदगीरमधील राजकीय हालचालीचा वेग मंदावला

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. अशातच आरक्षणाची सोडत रद्द झाल्याने राजकीय हालचालींचा वेग मंदावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आरक्षणानुसार तयारी करणाऱ्या उमेदवारांना आरक्षण रद्द झाल्याने मोठा धक्का बसला आहे.

पुन्हा तेच आरक्षण निघणार का? हा प्रश्न पडला असून अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीतून माघार घेण्याची मानसिक तयारी करत असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी-मार्च मध्ये मुदत संपणाऱ्या उदगीर तालुक्यातील पहिल्या टप्प्यात अवलकोंडा, आडोळवाडी, बामणी, बेलसकरगा, बोरगाव, भाकसखेडा, चांदेगाव, चिगळी, डांगेवाडी, डोंगरशेळकी, दावणगाव, धडकनाळ, एकुर्का रोड, इस्मालपुर, गंगापूर, गूडसूर, गुरदाळ, हकनकवाडी, हंगरगा, हंडरगुळी, हाळी, हिप्परगा, हेर, होनीहिप्परगा, जकनाळ, कौळखेड, जानापूर, करडखेल, करखेली, करवंदी, कासराळ, किनी, कुमठा, कोदळी, खेर्डा, क्षेत्रफाळ, कुमदाळ (उदगीर),  लिंबगाव, लोणी, लोहारा, मादलापूर, मल्लापुर, माळेवाडी, मांजरी, नळगीर, निडेबन, पिंपरी, रुद्रवाडी, सुमठाणा, शिरोळ, शेल्हाळ, तादलापूर, टाकळी, वागदरी, वाढवणा (बु), वाढवणा (खु), येनकी, कुमदाळ (हेर), अरसनाळ या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

पंकजा मुंडेंच्या ताब्यातील साखर कारखान्यात 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्यांची चोरी

ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात होत असलेल्या 61 गावच्या निवडणुकीत तालुका स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांच्या गावात निवडणुका होत आहेत. यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे (कुमठा), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील (हाळी), भाजपाचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, बाजार समितीचे संचालक पद्माकर उगिले, माजी सरपंच धर्मपाल नादरगै (नळगीर), महीला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड, बापुराव राठोड, जिल्हा परिषद सदस्य बस्वराज पाटील (कौळखेड), माजी पंचायत समिती सभापती सत्यकला गंभीरे (करवंदी), पंचायत समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. शिवाजी मुळे (दावणगाव), माजी उपसभापती रामदास बेंबडे (इस्मालपुर), पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले (डोगरशेळकी) यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर त्या-त्या गावचे प्रस्थापित व प्रतिस्पर्धी हे दोन्ही पॅनल प्रमुख आपापल्या परीने नियोजन करून तयारीला लागले होते. बहुतांश गावांमध्ये दुरंगी तर अनेक गावांमध्ये तिरंगी लढती दिसून येत होत्या. मात्र अचानकपणे आरक्षण रद्द झाल्याने अनेक पॅनल प्रमुखाने पॅनल प्रमुखाची जबाबदारी काढून घेतल्याने अनेक ठिकाणी राजकीय घडामोडींचा वेग मंदावला आहे.

औरंगाबादच्या सिडको चौकात भीषण अपघात; एक तरुण ठार, बसमधील दहा प्रवासी जखमी

नेमके आरक्षण कोणाला सुटणार? याचा अंदाज येत नसल्याने निवडून आल्यानंतर बघू अशी भूमिका घेऊन सध्या अनेक जण निवडणूक रिंगणात आपापल्या प्रभागांमध्ये निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असल्याची स्थिती सध्या दिसून येत आहे.

आरक्षण रद्द झाल्याने सरपंच पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार यांचाच हिरमोड झाला नसुन मतदारांचाही हिरमोड झाल्याची स्थिती आहे. नेमक सरपंच पद कोणाला आहे? हे कळल्यानंतर अधिक प्रगल्भतेने त्यांना मतदान करता येणे शक्य होते. मात्र आता सरपंच कोण होणार आहे हे माहीत नसताना पहिल्यांदा मतदान करावे लागत असल्याची चर्चा मतदारात सुरू आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image