लोहारा तालुक्यातील गावांत सत्तांतर; तरुणाईच्या हातात सूत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पराभूत

नीळकंठ कांबळे
Monday, 18 January 2021

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तरूणांनी सक्रिय सहभाग घेत ज्येष्ठ गाव पुढाऱ्यांपुढे कडवे आव्हान उभे केले होते.

लोहारा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील  २१ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले आहेत. वर्षानुवर्ष गावांवर ठाणमांडून बसलेल्या गाव पुढाऱ्यांना मतदारांनी अस्मान दाखवत बहुतांश गावांत सत्तांतर घडवून आणले असून गावची सूत्रे तरूणाईच्या हातात दिली आहेत. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. दहा टेबलांवर मत मोजणी झाली. २१ ग्रामपंचायतींच्या निवडून द्यावयाच्या १३८ जागेसाठी अटीतटीच्या लढती झाल्या.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तरूणांनी सक्रिय सहभाग घेत ज्येष्ठ गाव पुढाऱ्यांपुढे कडवे आव्हान उभे केले होते. वर्षानुवर्ष सत्तेवर ठाण मांडून बसलेल्या गावपुढाऱ्यांना मतदारांनी नाकारत नवीन दमाच्या तरूणांच्या हातात गावांची सत्ता दिली आहे. तालुक्यातील भातागळी, कानेगाव, कास्ती (खुर्द), होळी, हिप्परगा (सय्यद) मोघा यासह बहुतांश गावांमध्ये सत्तांतर झाले आहे.

कानेगाव येथे शिवसेना पुरस्कृत पॅनलची सत्ता
कानेगावच्या १३ जागेसाठी शिवसेना पुरस्कृत संत मारूती महाराज ग्रामविकास पॅनल व काँग्रेस पुरस्कृत संत कृपा ग्रामविकास पॅनलमध्ये अतितटीच लढत झाली. तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात शिवसेनेच्या पॅनलने १३ पैकी १३ जागावर विजय मिळवत काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा धुवाँ उडवला आहे. दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पुरस्कृत पॅनलला एकही जागा जिंकता न आल्याने नामष्कीला सामोरे जावे लागले आहे. युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख नामदेव लोभे यांनी पहिल्यांदाच एक हाती विजय मिळवत गावची सत्ता हस्तगत केली आहे. तर काँग्रस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांना परभवाला सामोरे जावे लागले आहे.

भातागळी ग्रामपंचायतीवर शंभो महादेव पॅनलची सत्ता
राजकीय वलय लाभलेल्या भातागळी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. शंभो महादेव ग्रामविकास पॅनलने ११ पैकी सात जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर कब्जा केला आहे. दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या साई प्रतिष्ठान ग्रामविका पॅनलला या निवडणुकीत जनतेने सपसेल नाकरले असून केवळ चार जागेवर समाधान मानावे लागले आहे. कास्ती (खुर्द) ग्रामपंचात निवडणुकीत चुलत्यापेक्षा पुतण्या ठरला सरस तालुक्यातील कास्ती (खुर्द) ग्रामपंचातीची निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरली. चुलता-पुतण्याच्या राजकीय लढाईत पुतण्या सरस ठरला आहे. महेश पाटील व सागर पाटील हे चुलते पुतणे असून दोघेही तरूण आहेत. शिवाय दोघेही काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यक्रर्ते आहेत. महेश पाटील यांची ग्रामपंचातीवर सत्ता आहे. परंतु मागील काही वर्षापासून या चुलत्या पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. यंदाच्या ग्रामपंचाय निवडणुकीत महेश पाटील यांच्या विरोधात सागर पाटील यांनी दंड थोपटत शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडी पॅनल तयार करून महेश पाटील यांच्या संत मारूती महारज पॅनलसमोर कडवे आव्हान उभे केले. यात सागर पाटील यांच्या पॅनलने सर्व सात जागांवर विजय संपादन करत चुलत्याच्या पॅनलचा धुवाँ अडवला. शिवाय प्रभाग तीनमधून सागर पाटील यांनी चुलते महेश पाटील यांना पराभूत करून आपणही राजकारणात कमी नसल्याचे दाखवून दिले.

काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व त्यांची पत्नी दोघेही पराभूत
तालुक्यातील कानेगाव ग्रामपंचातीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल पाटी व त्यांच्या पत्नी अर्चाना पाटील पराभूत झाले आहेत. प्रभाग पाचमध्ये अमोल पाटील व युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख नामदेव लोभे यांच्यात लढत झाली. यात लोभे यांनी पाटील यांच्यावर मात करीत बाजी मारली. तर प्रभाग तीनमधून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा परभाव आशा कदम यांनी केला. या निवडणुकीत पती-पत्नी दोघेही पराभूत झाल्यामुळे काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट होत असल्याचे चित्र आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Results Power Transformation Lohara Osmanabad News