"ऑनलाईन" नामनिर्देशनपत्रासाठी इच्छूक उमेदवारांचे "रात्री" चे जागरणं

अविनाश काळे
Tuesday, 29 December 2020

तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणूकीत ४५३ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. त्यात महिलांसाठी २५० तर पुरूषांसाठी २०३ जागा आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणूकीत ४५३ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. त्यात महिलांसाठी २५० तर पुरूषांसाठी २०३ जागा आहे. मात्र सोमवारपर्यंत (ता.२८) केवळ ३१ नामानिर्देशनपत्र दाखल झाले आहेत, मंगळवारी (ता. २९) जवळपास पन्नासहून अधिक नामानिर्देशनपत्र दाखल होतील. दरम्यान ऑनलाईन पद्धतीने नामानिर्देशनपत्र भरण्यासाठी दिवसा तांत्रिक अडचणी येताहेत, रात्रीच्या वेळी मात्र प्रक्रिया व्यवस्थित चालत असल्याने सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटेही शहरातील कॅपेमध्ये नामानिर्देशनपत्र भरण्यासाठी इच्छूक पुरुष, महिला उमेदवार ताटकळत थांबले होते.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची बुधवारी (ता.३०) अंतिम तारीख आहे. बहुतांश गावात उमेदवारांची कागदपत्र जमा करण्यासाठी अजुनही धावपळ सुरु असून गाव पातळीवरील तडजोडीला वेळ लागत आहे. काही मोजक्या ग्रामपंचायती बिनविरोध येण्याची शक्यता आहे मात्र बहुतांश गावात दोन आघाड्यात निवडणूकीचे चित्र दिसून येणार आहे. ४५३ जागा असल्याने दोन आघाड्यासह कांही अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात येणार असल्याने जवळपास एक हजार नामानिर्देशनपत्र दाखल होतील. परंतू ऑनलाईनच्या प्रक्रियेमुळे विलंब होत आहे. बुधवारपर्यंत नामानिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी इच्छूकांची चांगलीच धावाधाव होणार आहे.

संदीप क्षीरसागरांना धक्का; समर्थक बाळासाहेब गुंजाळांचा शिवसेनेत प्रवेश

गत आठवड्यात शुक्रवार ते रविवारपर्यंत सुट्टया होत्या. त्यामुळे तहसील कार्यालयातून मिळणारे कागदपत्रे मिळू शकली नाहीत. मागासवर्गीय उमेदवारांसाठी २०१ जागा आरक्षित असल्याने बहुतांश उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आहे मात्र जात वैधता प्रमाणपत्र नाहीत, त्याचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयात गर्दी होती. ३६१ इच्छूक उमेदवारांना प्रस्ताव तयार करुन देण्यात आले आहेत, ते प्रस्ताव दाखल करण्यासाठी जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल करण्यासाठी उमेदवारांना उस्मानाबादची फेरी करावी लागत आहे.

लातूर महापालिकेचे आर्थिक गणितच जुळेना, आठशे कर्मचारी पगारीच्या प्रतीक्षेत

मंगळवारी प्रस्ताव दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होती. दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी होणारी धावाधाव पहाता ऑफलाईनचा पर्याय दिला तर ऐनवेळी उडणारा गोंधळ थांबेल. असे मत अनेक इच्छूक उमेदवारांनी व्यक्त केले आहे. ऑफलाईनच्या पर्यायाचा कोणताही आदेश अद्यापपर्यंत निवडणूक विभागाकडून आलेला नाही असे नायब तहसीलदार विलास तरंगे यांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election Umarga Usmanabad political news