उस्मानाबाद : ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी अखेरला? मतदार यादी एक डिसेंबरला प्रसिद्ध होणार

सयाजी शेळके
Thursday, 26 November 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेचारशे ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याचे संकेत मिळत आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील साडेचारशे ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यामुळे गावकारभाऱ्यांची चांगलीच पळापळ सुरू झाली आहे. एक डिसेंबर रोजी यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून १० डिसेंबरला यादी अंतिम करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे ग्रामपंचायतीच्या निवडणुका येणाऱ्या टप्प्यात होत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायत निवडणुकीकडे जिल्ह्यातील पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे. आपल्या जवळचा कोण? कोणत्या वॉर्डात कोणता उमेदवार सोयीचा पडेल. कोणत्या वॉर्डात, कोणत्या समाजाचे मतदान आहे. याचा अंदाज घेत चर्चेचे फड रंगू लागले आहेत.

मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांची २५ सप्टेंबर २०२० रोजीची विधानसभेची यादी निश्चित करण्यात आली आहे. ती प्रभागनिहाय यादी एक डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. ता.एक डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान यावर हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर १० डिसेंबर रोजी यादी अंतिम केली जाणार आहे. ही यादी ग्रामपंचायत, तलाठी सजा, मंडळ अधिकारी कार्यालय, पंचायत समिती तसेच तहसीलच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मतदारांनी आपल्या नावाची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाचा अडथळा?
सध्या कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत. जर कोरोनाची दुसरी लाट आली नाही तर जानेवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याचे संकेत आहेत. तशी तयारीही प्रशासनाकडून केली जात आहे. मात्र जर कोरोनाचा संसर्ग वाढला तर यामध्ये बदल होण्याचे शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited - Ganesh Pitekar

 

 

(दावने जोड)
---
शिवसेनेवर टीका
---
उस्मानाबाद ः राज्य शासन सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असून राज्यातील जनता या सरकारला कंटाळली आहे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका बदलेली आहे. पूर्वीची शिवसेना राहिलेली नाही, असेही ते म्हणाले. माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, गोविंद केंद्रे आदी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is Grampanchayats Elections Of Osmanabad District Juanary End?