द्राक्षे लगडली; पण विकावी कोठे? 

बाबासाहेब गोंटे
Wednesday, 8 April 2020

गतवर्षी पावसाने साथ न दिल्याने विहीर हिवाळ्यापासूनच कोरडीठाक पडली. पाण्याच्या नियोजनासाठी व साठवण क्षमतेसाठी दीड एकर शेतजमिनीत शेततळे बनविले. चार महिन्यांपासून पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याप्रमाणे पाणी विकत घेऊन द्राक्षबाग मोठ्या उत्पन्नाच्या अपेक्षेने जगविली व फुलविली आहे.  

अंबड  (जि.जालना) -  विकतचे पाणी देऊन, दिवसरात्र कष्ट घेऊन द्राक्षबाग बहरली, द्राक्षे लगडली; पण आता विकावी कोठे, असा प्रश्‍न उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. कोरोनामुळे संचारबंदी असल्याने बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. 

शहरालगत असलेल्या पारनेर येथील भाऊसाहेब भावले यांनी चार एकर शेतात प्रयोगशीलता जोपासत वर्ष २०१८ मध्ये चार हजार द्राक्षरोपांची लागवड केली. सेंद्रिय खत, लोखंडी एंगल्स, लाकडी बांबू, ठिबक सिंचन यासाठी त्यांना सरासरी दहा ते बारा लाख रुपये खर्च आला.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

गतवर्षी जवळपास साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता त्यांना एक लाख रुपये नफा मिळाला; मात्र त्यानंतर पाणीटंचाई, नैसर्गिक आपत्ती, बेमोसमी पाऊस अशी संकटे उद्‍भवली. शिवाय गतवर्षी पावसाने साथ न दिल्याने विहीर हिवाळ्यापासूनच कोरडीठाक पडली.

हेही वाचा :  बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

पाण्याच्या नियोजनासाठी व साठवण क्षमतेसाठी दीड एकर शेतजमिनीत शेततळे बनविले. चार महिन्यांपासून पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याप्रमाणे पाणी विकत घेऊन द्राक्षबाग मोठ्या उत्पन्नाच्या अपेक्षेने जगविली व फुलविली आहे. सध्या तीस ते पस्तीस टन द्राक्षे आहेत; पण विकावे कोठे, या विवंचनेत ते आहेत. 

द्राक्षबागेत सरासरी तीस ते पस्तीस टन माल आहे; मात्र कोरोनामुळे बाजारपेठ व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. द्राक्ष विक्री करावी तरी कुठे, दुसरे संकट म्हणजे सध्या विकतचे पाणी सुरू आहे. सध्या किरकोळ द्राक्षांची विक्री जागेवर करीत आहेत. द्राक्ष बागेतून नुकसान सहन करावे लागत आहे. 
- भाऊसाहेब भावले, 
द्राक्ष उत्पादक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grapes producer farmers in trouble