सामाजिक बांधिलकी जोपासत महामानवास अभिवादन, कुठे ते वाचा...

dhvaj
dhvaj

हिंगोली ः दरवर्षी धुमधडाक्‍यात साजरी होणारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊन, संचारबंदी व जमावबंदीमुळे मंगळवारी (ता.१४) जिल्‍हाभरात अंत्यत साध्या पध्दतीने घरोघरी साजरी करण्यात आली. यामध्ये कुटूंबीयांसह प्रतिमा पूजन करून महामानवास अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशीकेचे वाचन देखील या वेळी करण्यात आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी गरजूंना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करून तसेच अन्नदान आणि खीर-पुरीचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. 

डॉ. आंबेडकर चौकात कार्यक्रम
हिंगोली ः शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याजवळ समितीच्या दोघांना अभिवादन करण्यास शासनाच्या नियमाप्रमाणे परवानगी देण्यात आली होती. त्‍याप्रमाणे पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकर मांजरमकर, समितीचे कोषाध्यक्ष जगजीतराज खुराणा यांच्या उपस्‍थितीत डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजारोहन करण्यात आले. या वेळी पोलिस प्रशासनातील अधिकारी श्री. शेख यांची उपस्‍थिती होती.

डॉ. आंबेडकर स्‍मारक समिती
हिंगोली ः शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍मारक समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून त्‍यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, स्‍मारक समितीचे अध्यक्ष दिवाकर माने, मिलिंद कवाने, सुरेश वाढे, सुनिल इंगोले, रमेश इंगोले, सुभाष ठोके, विशाल इंगोले, प्रकाश वाढे, भास्‍कर खंदारे यांचा सहभाग होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
हिंगोली ः येथील इलेक्‍ट्रॉनिक मिडीयाचे पत्रकार सुधाकर वाढवे व त्‍यांच्या कुटूंबीयासोबत त्‍यांच्या निवासस्‍थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्‍यांना पुष्पहार अर्पण केला. या वेळी मनिषा वाढवे यांनी बुध्द वंदना व परिपाठ घेतला. त्‍यानंतर शितल वाढवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. ‘कोरोना’च्या धर्तीवर जिल्ह्यातील नागरिकांनी घराच्या बाहेर पडु नका असे आवाहन देखील त्‍यांनी केले. या वेळी अक्षय वाढवे, शुभम वाढवे, रितेश वाढवे हे देखील कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते खीर-पुरीचे वाटप 
हिंगोली ः लॉकडाऊनमुळे मोलमजुरी करणाऱ्यांची कामे थांबल्याने त्‍यांच्या उदरनिर्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे हे मागच्या अनेक दिवसांपासून शहरात अन्नधान्य, गरजुंना भोजन पुरवित आहेत. मंगळवारी (ता.१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खीर-पुरीचे वाटप करून डॉ. बाबासाहेबांना आदराजंली अर्पण केली. आमदार तान्हाजी मुटकुळे हे मागच्या अनेक दिवसांपासून धान्यासह भोजनदेखील देत आहेत. गरजुपर्यंत हे पोहचविण्यासाठी त्‍यांना त्रिशुल नवदुर्गा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. दरम्यान, मंगळवारी त्‍यांनी खीर पुरीचे वाटप केले. या वेळी आमदार मुटकुळे यांच्यासह नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रशांत सोनी (गोल्डी) भाजपाचे शहराध्यक्ष कैलाशचंद्र काबरा, हमिदभाई प्यारेवाले यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व त्रिशुल नवदुर्गा महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. 

आखाडा बाळापूरला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 
आखाडा बाळापूर ः येथील सामाजिक कार्यकर्ते ओंकार अमाने यांनी परिसरातील १२६ गरजू व्यक्तींना मंगळवारी (ता.१४) धान्य वाटप करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली. सामाजिक कार्यकर्ते ओंकार अमाने हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांच्या तसेच गरजूंच्या अकरा मुलींच्या विवाह सोहळ्यामध्ये अन्नदानासाठी मदत करतात. याशिवाय ओंकार अमाने मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमदेखील घेतले जातात. सर्वसामान्य गरजू कुटुंब चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी ओंकार अमाने यांनी पुढाकार घेतला. मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त श्री.अमाने यांनी शहरातील गरजू व्यक्तींना मोफत धान्याचे वाटप केले. सुमारे शंभरपेक्षा अधिक गरजूंना एक महिनाभर पुरेल एवढे धान्य वाटप करून त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com