राजूरजवळ पकडला ५० पोती गुटखा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

राजूरजवळ पोलिसांनी बुधवारी पहाटे ट्रकमधून कर्नाटकातून मलकापूरला वाहतूक होणारा तब्बल ५० पोती गुटखा जप्त केला; तसेच ट्रकसह ७४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. 

भोकरदन/राजूर (जि.जालना) -  जालना-भोकरदन रोडवर राजूरजवळ पोलिसांनी बुधवारी (ता. १३) पहाटे ट्रकमधून कर्नाटकातून मलकापूरला वाहतूक होणारा तब्बल ५० पोती गुटखा जप्त केला; तसेच ट्रकसह ७४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. 

हसनाबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एम. एन. शेळके यांचे पथक एका गुन्ह्यातील फरारी संशयित संदीप दत्ता भूमकर (वय २३, रा. राजूर) यास पकडून ठाण्याकडे निघाले होते. तेव्हा बुधवारी पहाटे जालना-भोकरदन रोडवर तपोवन पाटीजवळ एक संशयित ट्रक भरधाव वेगाने जाताना दिसला. पोलिसांनी पाठलाग करून राजूरजवळ हा ट्रक थांबविला. तेव्हा चालक संशयित शेख अफरोज शेख शब्बीर (वय ३२), त्याचा सहकारी सय्यद सुलेमान सय्यद उस्मान (दोघे रा.म लकापूर) यांची चौकशी केली. तेव्हा ट्रकमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याचे पोलिसांना कळाले.

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

पोलिसांनी ट्रकची ताडपत्री काढून पाहिली असता, राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची तब्बल ५० पोती आढळली. चालकाने ट्रकमालकाचे नाव संशयित शेख लतीफ शेख हुसेन, तर गुटखा घेणाऱ्याचे नाव अतिक ऊर रहमान (दोघे रा. मलकापूर) असे सांगितले. हा गुटखा कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून मलकापूरला नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी ५४ लाख ९० हजारांचा गुटखा; तसेच २० लाख रुपयांचा ट्रक असा ७४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री

याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी संजय चट्टे यांच्या फिर्यादीनुसार हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्री. शेळके करीत आहेत. श्री. शेळके यांच्यासह प्रताप चव्हाण, दुर्गेश राठोड, परमेश्वर टेपले, सुधाकर टेपले, अनिल डुरे आदींनी ही कारवाई केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha seized by police in Rajur