esakal | परभणीत लावला सापळा अन् पकडला सोळा लाखांचा गुटखा 
sakal

बोलून बातमी शोधा

karvai

परभणी शहरात एका ट्रकमधून बुधवारी गुटख्याचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला.  

परभणीत लावला सापळा अन् पकडला सोळा लाखांचा गुटखा 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. २३) पाथरी रोड परिसरात सापळा लावून ट्रक पकडला. या वेळी केलेल्या कारवाईत ट्रकमधून १६ लाखांचा गुटखा जप्त करण्‍यात आला. 

शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रवीण मोरे यांना मिळाली. पोलिस अधीक्षक उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पाथरी रोड परिसरात सापळा लावून ट्रक पकडला. ट्रकमधील व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकाने केलेल्या तपासणीत १४ लाख ५६ हजारांचा सुगंधित पान मसाला, ८५ हजार ८०० रुपयांचा जाफरानी जर्दा आढळला. 

ट्रकसह साडेएकतीस लाखाचा मुद्देमाल जप्त
ट्रकसह ३१ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक समोल दिलीपराव ढोबळे, तुकाराम हनुमंत वसके यांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक शरद विपट, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, अरुण पांचाळ, शिवदास धूळगुंडे, शंकर गायकवाड, जमीरोद्दीन फारोकी, हरिश्चंद्र खुपसे, अरुण कांबळे आदींनी ही कारवाई केली. 

हेही वाचा - परभणीत जुन्या जलवाहिण्यांवरील पाणी वितरण होणार बंद

पूर्णेत जाणार होता गुटख्याचा ट्रक 
दीपक ऊर्फ दीपक सिंग यांच्या मदतीने माल भरला होता, तो पूर्णा येथील सय्यद नामक व्यक्तीस पुरविण्याबाबत सांगण्यात आल्याचे ताब्यात घेतलेल्या दोघांनी सांगितल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली. नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फौजदार संतोष मुपडे तपास करीत आहेत. 

हेही वाचा - हे रंग तुम्हाला भुरळ घालताहेत...तर सावधान...!

तहसीलच्या आवारातून वाळूचे ट्रॅक्टर झाले गायब 
जिंतूरः तालुक्यात अवैध मार्गाने वाळू उत्खनन करून वाहतूक करत असताना पंधरा दिवसांपूर्वी महसूल कर्मचाऱ्यांनी विनानंबरचे एक ट्रक्टर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले. परंतु, मागील काही दिवसांपासून ट्रॅक्टर जागेवर दिसत नसल्याने ट्रॅक्टर मालकाने तहसील कार्यालय गाठून माझे ट्रॅक्टर कुठे आहे असे विचारत कार्यालयात चौकशी केली. तोपर्यंत बेखबर असलेले कर्मचारी खडबडून जागे होऊन ट्रॅक्टरची शोधाशोध सुरू केली खरी; पण विनानंबरचे ट्रॅक्टर काही मिळालेच नाही. शेवटी तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी विजय बोधले व तलाठी एन.बी.बुड्डे यांनी सोमवारी (ता.२१) पोलिस ठाण्यात सदर प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक स्वामी तपास करत आहेत. 

संपादन ः राजन मंगरुळकर