जनावरांसह नागरिकांची पळापळ; जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिट

दीपक सोळंके
Thursday, 18 February 2021

दुपारी शहरासह तालुक्यातील मुठाड, ईब्राहिमपूर, तांदुळवाडी, मालखेडा, आव्हाना, फत्तेपुर, नांजा, मलकापूर, मनापूर, मासनपूर, प्रल्हादपूर, सिपोरा बाजार, विरेगाव भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

भोकरदन (जि. जालना) : भोकरदन शहरासह तालुक्यातील काही भागात गुरुवारी (ता.18) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पाऊस व गारपिटीने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील वातावरणात बदल झाला होता. गुरुवारी दुपारी बारा वाजल्यापासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती.

वाचा : ‘शिर्डीला मित्रांसोबत दर्शनासाठी जाऊ नको’,असे सांगताच वडिलांवर राग धरुन सतरा वर्षांचा मुलगा बेपत्ता

दुपारी शहरासह तालुक्यातील मुठाड, ईब्राहिमपूर, तांदुळवाडी, मालखेडा, आव्हाना, फत्तेपुर, नांजा, मलकापूर, मनापूर, मासनपूर, प्रल्हादपूर, सिपोरा बाजार, विरेगाव भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी पावसासह मोठ्या प्रमाणावर गारपिट झाल्याने जोमात असलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा आदी रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर आंब्याला आलेला मोहर गळून पडला आहे. शिवाय अनेक झाडांचे नुकसान झाले. आधीच तालुक्यातील शेतकरी सहा वर्षांपासून कधी ओल्या तर कोरड्या दुष्काळात होरपळून निघत आहे. त्यात गुरुवारी झालेल्या निसर्गाच्या माऱ्याने तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

वाचा : औरंगाबादकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, १३७ जण कोरोनाबाधित

माणसांसह पक्षी, जनावरांची पळापळ
तालुक्यातील काही भागांत गुरुवारी अचानक आलेल्या वादळी वारा, पाऊस व गारपिटीने अनेकांची तारांबळ उडाली. तर गारपिटीने पक्षी, वानर, कुत्रे व इतर जनावरांची सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी एकच धावपळ उडाली. गारपिटीने लहान-लहान पक्षी मृत व जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hailstorm, Untimely Rain Hit Bhokardan Taluka Jalna Latest News