
अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी शिवारातील पाझर तलावात शनिवारी (ता. दोन) एक हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील महादेववाडी शिवारातील पाझर तलावात शनिवारी (ता. दोन) एक हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने रविवारी (ता. तीन) या परिसरात त्याचा स्फोट करून तो निकामी केला. महादेववाडी तलावाशेजारील शेती असलेले यलमटे हे शनिवारी सकाळी अकरा वाजता जनावरांना पाणी पाजवण्यासाठी तलावाकडे गेले होते. त्यांना तलावात हातबॉम्ब दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. हा बॉम्ब फुटू नये, यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी काळजी घेतली.
बॉम्ब शोधक व नाशक पथकास पाचारण केले. पथकाने रविवारी दुपारी दोन वाजता सापडलेल्या ठिकाणाहून दोनशे मीटर अंतरावर स्फोट करून हा बॉम्ब निकामी केला. यावेळी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उप विभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे सदस्य, लातूर दहशत विरोधी पथकाचे जी. एस. गल्लेकाटू, सूर्या श्वान पथक, पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला, रमेश आलापुरे उपस्थित होते.
नेमका कुठून आला बॉम्ब?
ज्या ठिकाणी हा हातबॉम्ब आढळाला. त्या परिसरातून लातूर-नांदेड रस्ता जातो. या रस्त्याने जाणाऱ्या कुणीतरी पावसाळ्यात हा बॉम्ब फेकून दिला असता आणि तो वाहत-वाहत तलावात आला असावा, असा अंदाज परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हॅड ग्रेनाईड सदृश वस्तू निकामी केली आहे. या वस्तूचे तुकडे एकत्र करून प्रयोग शाळेत पाठवले जाणार आहेत. तिथे तज्ज्ञांच्या वतीने तुकड्यांचे परीक्षण केले जाईल. त्यानंतर या वस्तूत वापरलेली रसायन कोणती व किती प्रमाणात होते हे कळेल. तपास चालू राहील.
- निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक, लातूर.
Edited - Ganesh Pitekar