esakal | कोरोनाच्या काळोख्या छायेत राबताहेत महावितरणचे हात

बोलून बातमी शोधा

फोटो

कोरोनाच्या काळोख्या छायेत राबताहेत महावितरणचे हात
दैनंदिन व्यवहार बाजूला सारून जीवनावश्यक सेवेसाठी अखंडीत वीज पुरवण्यास प्राधान्य

कोरोनाच्या काळोख्या छायेत राबताहेत महावितरणचे हात
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केल्याने सर्वांना घरात राहावे लागत आहे. अशावेळी वीजग्राहकांना घरात राहणे सुसह्य व्हावे. घरी बसूनच अत्यावश्यक कामे करता यावीत यासाठी अखंडीत वीजपुरवठा मिळावा या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळातील हजारो कर्मचारी कोरोनाच्या संकटाला न डगमगता संसर्ग टाळण्याची खबरदारी घेऊन कर्तव्य बजावत आहेत.

कोरोनाची गर्द काळोखी छाया असतानाच गेल्या दोन- तीन दिवसांत नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारा व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. अशा प्रसंगी महावितरणचे अभियंते, कर्मचारी धावले आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम त्यांनी युद्धपातळीवर केले. भर पावसात वादळ वाऱ्याची पर्वा न करता चिखल तुडवत बिघाड शोधण्यासाठी त्यांनी पायपीट केली. काही ठिकाणी झाडे पडून वीजवाहिन्या तुटून पडलेल्या होत्या. एकीकडे कोरोनाची भिती आणि दुसरीकडे सोशल डिस्टंसिंग पाळत वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे आव्हान पेलत केवळ दोन ते तीन तासात वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश प्राप्त केले. एरव्ही जिथे पाच- सहा तास लागले असते अशा वेळी कोरोनाच्या काळोखाला दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे आपली कर्तव्यनिष्ठा बजावत महावितरणच्या हजारो हातांनी काळोखावर मात करत प्रकाश पेरला.

हेही वाचाक्रिकेटच्या मैदानावरील अनोखे किस्से, कोणते? ते वाचाच

लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरी बसावे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खासगी तसेच सरकारी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची मुभा सरकारने दिली आहे तसेच लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरी बसावे लागले आहे, त्यांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता, संचालक दिनेशचंद्र साबू, संचालक ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) पवनकुमार गंजू यांच्यासह वरिष्ठ व स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी प्रभावी नियोजन केल्याने आणि क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवणे महावितरणला शक्य झाले आहे.

अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे

वीज ही अत्यावश्यक बाब असल्याने तिचा अखंडित पुरवठा ठेवण्यासाठी महावितरणने आपल्या कार्यप्रणालीत महत्त्वाचे बदल केले आहेत. सरकारला आरोग्यविषयक खबरदारी घेता यावी यासाठी अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. तांत्रिक किंवा इतर कारणाने खंडित झालेला विद्युतपुरवठा युद्धपातळीवर प्रयत्न करून तात्काळ पूर्ववत करण्यात येत आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार राज्यात वीजविषयक कार्यप्रणालीत बदल करून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार महावितरणने मिटर रीडिंग आणि वीज बिलांचे काम तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवून सरासरी वीज बिले देण्याचा निर्णय घेतला आहे. वस्तुत: सरासरी वीज बिले देण्याचा प्रयोग महावितरणसारख्या वाणिज्यिक व्यवस्थापनास आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. मात्र, कोरोना संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त आणि अत्यांतिक गरजेचा आहे.

येथे क्लिक करा - देश अदृष्य शत्रुशी लढतो आहे- प्रा. मनोज बोरगावकर

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांचे निर्देश

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर त्याचबरोबर नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे, परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे तसेच हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव हे सातत्याने वीज यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. वीजपुरवठा खंडीत झाल्यास तो तात्काळ पुर्ववत होण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवून आहेत. वीजग्राहकांनी टाळेबंदीच्या काळात योग्य ती काळजी घ्यावी. विजेच्या समस्येबाबत ऑनलाईन यंत्रणेचा वापर वाढवावा तसेच वीजपुरवठयाबाबत काही समस्या असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकासह नांदेड जिल्ह्यातील वीजग्राहकांनी 7875473980 आणि परभणी जिल्ह्यातील वीजग्राहकांनी 7875476326 त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील वीजग्राहकांनी 7875447143 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.