esakal | राज्यातील दुसरे माथेरान मराठवाड्यात - वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Hattibet News Udgir

लातूर जिल्ह्यातील मिनी माथेरान असलेल्या हत्तीबेट (देवर्जन) पर्यटनस्थळास राज्य शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आला असल्याचे आदेश राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंगळवारी (ता. तीन) जारी केले. 

राज्यातील दुसरे माथेरान मराठवाड्यात - वाचा सविस्तर

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर : लातूर जिल्ह्यातील मिनी माथेरान असलेल्या हत्तीबेट (देवर्जन) पर्यटनस्थळास राज्य शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आला असल्याचे आदेश राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंगळवारी (ता. तीन) जारी केले.  

हेही वाचा-  बेवारस कुत्रीच्या उपचारासाठी शिक्षकांचा पुढाकाराने रूग्णवाहिका आली धावून

जिल्ह्याच्या उदगीर, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या हत्तीबेट पर्यटनस्थळाच्या ठिकाणी सुमारे ६०० वर्षांपूर्वीची सद्‍गुरू गंगानाथ महाराज यांची संजीवन समाधी, कोरीव लेणी, गुहा याबरोबरच हैदराबाद मुक्तिसंग्रामात निजामाविरुद्ध लढा दिलेले हे ठिकाण आहे. वन विभागाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्यामुळे दररोज हत्तीबेटास भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हत्तीबेट आता मिनी माथेरान बनले आहे.

क्लिक करा- लातूरात मालमत्ता कराची सात दिवसांत एक कोटीची वसुली : मोठे थकबाकीदार मात्र मोकाटच

हत्तीबेटास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी जानेवारी २०१८ मध्ये राज्य शासनाकडे दाखल केला होता. उदगीर पंचायत समिती, लातूर जिल्हा परिषद व उदगीर येथे पार पडलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनासह जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सभेत तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी हत्तीबेट पर्यटनस्थळास ‘ब’ वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता. शिवाय या पर्यटनाच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांची मागणीही श्री. निलंगेकर यांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्तीबेटाच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा उदगीरच्या सभेत केली होती. मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे हे काम थांबले होते.

निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर उदगीर मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व सध्याचे राज्याचे संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी हत्तीबेट पर्यटनस्थळास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्याचे अभिवचन दिले होते. त्यानुसार राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून हत्तीबेटाचा हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यानुसार राज्य शासनाने मंगळवारी हत्तीबेटास ‘ब’ वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्याचे आदेश जारी केले आहेत.

हे वाचलंत का- आधी पत्नीचा गळा घोटला, नंतर गर्भवती प्रेयसीलाही संपविले, बीडच्या हैवानाला जन्मठेप..

शासनाच्या या निर्णयामुळे या हत्तीबेटास पर्यटनाचा ‘ब’ दर्जा मिळाल्याने या परिसरातील भाविक भक्तांनी जल्लोष केला आहे. शिवाय येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीसुद्धा भविष्यकाळात आधुनिक सुविधा निर्माण होणार असल्याने एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून पुढे येण्यास आणखी मदत होणार आहे.

माझ्या आजोबा-पणजोबापासून या हत्तीबेटाचे आम्ही सेवक आहोत. गंगानाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या बेटास पर्यटनाचा ‘ब’ दर्जा मिळाला आहे. त्याचा खूप आनंद परिसरातील भाविकांना झाला असून भविष्यात त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
- गंगाधर गोसावी, पुजारी हत्तीबेट.

हे वाचलंत का?- भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, असे आहे प्रकरण...