पाहुण्यांना ‘होम क्वारंटाइन’ केले...बीड जिल्ह्यात आरोग्य सेविकेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

अनिरुद्ध धर्माधिकारी
Friday, 12 June 2020

दोन दिवसांपूर्वी कऱ्‍हेवडगाव येथे पनवेलहून (मुंबई) एक महिला तसेच पुण्याहून एक पुरुष व दोन महिला असे पाहुणे गायकवाड कुटुंबाकडे आले. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर याची माहिती मिळताच सुवर्णा यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना कळविले.

आष्टी (जि. बीड) - मुंबई-पुण्याहून आलेल्या पाहुण्यांची माहिती वरिष्ठांना देऊन होम क्वारंटाइन केले म्हणून गावातील आरोग्यसेविकेस एका कुटुंबातील सदस्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तालुक्यातील कऱ्हेवडगाव येथे काल (ता. दहा) दुपारी हा प्रकार घडला.

याबाबत आरोग्यसेविका सुवर्णा राजू गायकवाड-साठे यांनी आष्टी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून कऱ्‍हेवडगाव येथील संजय किसन गायकवाड, राजेंद्र किसन गायकवाड, अर्चना संजय गायकवाड, कोमल राजेंद्र गायकवाड, लताबाई किसन गायकवाड, सत्यभामा पोपट गायकवाड, सागर पोपट गायकवाड व सोमिनाथ जयसिंग गायकवाड (सर्व रा. कऱ्‍हेवडगाव, ता. आष्टी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सुवर्णा गायकवाड-साठे या कंत्राटी आरोग्यसेविका असून, टाकळसिंग प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणाऱ्‍या पोखरी उपकेंद्रात कार्यरत आहेत. त्यांचे माहेर भूम (जि. उस्मानाबाद), तर सासर कऱ्‍हेवडगाव आहे. त्यांच्याकडे पोखरी-कऱ्‍हेवडगावसह परिसरातील सात-आठ गावांची जबाबदारी आहे. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

दोन दिवसांपूर्वी कऱ्‍हेवडगाव येथे पनवेलहून (मुंबई) एक महिला तसेच पुण्याहून एक पुरुष व दोन महिला असे पाहुणे गायकवाड कुटुंबाकडे आले. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर याची माहिती मिळताच सुवर्णा यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना कळविले. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वाघ यांनी काल (ता. दहा) कऱ्‍हेवडगाव येथे येऊन संबंधितांच्या घरी जाऊन चारही पाहुण्यांना ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारला व चौदा दिवस घराबाहेर येऊ नका, असे सांगितले. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

दरम्यान, डॉ. वाघ गावातून गेल्यानंतर सुवर्णा या दुपारी साडेतीनच्या सुमारास आपल्या घराकडे येत असताना गायकवाड कुटुंबातील आठजणांनी त्यांना घराजवळ शिवीगाळ सुरू केली. ‘माझी बहीण पनवेलहून आल्याची माहिती तू वरिष्ठांना का दिली? तू आता आमच्या हाताने नीट राहणार नाहीस’ असे म्हणून वरील आठजणांनी केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हात पिरगाळून ‘लई माजली आहे. बघूच कशी नोकरी करते?’ असे म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ व मारहाण केली.; तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. सुवर्णा यांची घरच्यांनी सुटका केली. नंतर वरिष्ठांना माहिती दिली. याप्रकरणी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health worker beaten in Beed district