लातूरमध्ये ९१ मुलांवर ह्रदयशस्त्रक्रिया, ५७२ जणांवर इतर शस्त्रक्रिया

हरी तुगावकर
Wednesday, 16 December 2020

लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील एक लाख ७२ हजार ६९७ बालक व विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

लातूर : जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील एक लाख ७२ हजार ६९७ बालक व विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच शाळातील तीन लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. शाळा व अंगणवाडीतील मुलांच्या एकूण ९१ हृदयशस्त्रक्रिया करण्यात आले आहेत. तसेच एकूण ५७२ बालक व विद्यार्थ्यांची इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष्मणराव देशमुख यांनी दिली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ३० वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

 

या पथकामार्फत ० ते ०६ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य तपासणी करुन कुपोषण दूर करणे व ०६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण करुन त्यांना अंगणवाडी व शाळास्तरावर किरकोळ औषधोपचार करणे तसेच संदर्भित करुन योग्य तो उपचार व शस्त्रक्रिया करुन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यात २५ हजार बालकांमागे १ वैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

 

 

प्रत्येक तालुक्यास २ वैद्यकीय अधिकारी, १ परिचारिका, १ औषध निर्माता देण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत २०१९-२० मध्ये एकूण दोन हजार ५६६ अंगणवाडींची तपासणी करण्यात आली. यात एक लाख ७२ हजार ६९७ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. एकूण १ हजार ९५५ बालकांवर उपचार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ९८० शाळा तपासणी करुन त्यामध्ये एकूण ३ लाख १३ हजार ३४८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली असून एकूण ४ हजार ५४६ विद्यार्थ्यांना उपचार देण्यात आलेले आहेत. २०१९-२० मध्ये शाळा व अंगणवाडीतील एकूण ९१ हृदयशस्त्रक्रिया करण्यात आले आहेत. तसेच एकूण ५७२ बालक व विद्यार्थ्यांची इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष्मणराव देशमुख यांनी दिली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heart Operation Of Ninety One Children In Latur