esakal | उदगीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ऊस व फळबागांचे अतोनात नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain In Udgir

उदगीर  तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे व काही मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, ऊस व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

उदगीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ऊस व फळबागांचे अतोनात नुकसान

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे व काही मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, ऊस व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारी (ता.१३) रात्रीपासून पावसाला सुरवात झाली. यात अधूनमधून आलेल्या वादळाने व सततच्या पावसाने काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनची काढणी झाल्यानंतर गोळा करून ठेवलेल्या सोयाबीनच्या काडावर झाकलेल्या ताडपत्र्या उडाल्याने सोयाबीन भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले, ३५ मंडळात अतिवृष्टी, शेतकरी अडचणीत !


मोघा, देवर्जन व हेर या तीन महसूल मंडळाच्या पट्ट्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनच्या बनीम पाण्यात गेल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणच्या ऊस आडवा झाला आहे. शिवाय परिसरातील पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. टोमॅटो, कांदा, मिरची व नव्याने पेरलेले हरभरा या रष्षी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सततच्या पावसाने शेतात उभे असलेली सोयाबीन पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

अनेक नदी, नाले, ओढ्याचे पाणी पात्र सोडून वाहत असल्याने मोठ्या प्रमाणावर लगतच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची झाडे कोसळली आहेत. अनेक ठिकाणी स्थावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता.१४) तालुक्यातील पर्जन्यमापक आवर मंडळनिहाय नोंद झालेली आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढील प्रमाणे, उदगीर ६४.५, नागलगाव ८४.५, वाढवणा ४६.३, नळगीर ४०, मोघा ९०, हेर ५१.३, देवर्जन ९१.३, तोंडार ५४.३. तालुक्‍यातील आठ महसूल मंडळात आतापर्यंत ७९०२ मिलिमीटर तर आतापर्यंतचे एकूण सरासरी पर्जन्य ९७५.७७ मिलिमिटर एवढ्या पर्जन्याची नोंद झाली आहे.

लातूरात धो-धो : 'मांजरा' भरण्याच्या वाटेवर, 'तेरणा' चे दरवाजे उघडण्याची शक्यता !  
पावसामुळे वीज गुल
मंगळवारी रात्री सुरू झालेल्या वादळी पावसामुळे शहराचा काही भाग व ग्रामीण भागातील अनेक गावातील वीज जवळपास आठ ते दहा तास गायब झाली आहे. त्यामुळे एकीकडे वादळी वारे, दुसरीकडे पाऊस, तिसरीकडे शेतीचे नुकसान अप त्यात लाईट गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

संपादन - गणेश पिटेकर