esakal | अतिवृष्टीने साडेबाराशे किलोमीटरच्या रस्त्यांची लागली 'वाट'
sakal

बोलून बातमी शोधा

raste.jpg

लातूर जिल्ह्यात अडीचशे पूल खराब; वीजव्यवस्था व मालमत्तांचे नुकसान 

अतिवृष्टीने साडेबाराशे किलोमीटरच्या रस्त्यांची लागली 'वाट'

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : या महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके व जमिनींसोबत जिल्ह्यातील तब्बल बारा हजार २४१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे नुकसान झाले आहे. आधीच खराब असलेल्या रस्त्यांची अतिवृष्टीने दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील वाहतुकीची अडचण झाली आहे.यासोबत अनेक भागात रस्त्यावरील पूल वाहून गेले. काही भागात पूल खचून नुकसान झाले आहे. अशा जिल्ह्यातील २५४ पुलांच्या तातडीने दुरुस्तीची गरज आहे. यामुळे रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसह वीज व्यवस्था व सरकारी मालमत्तांच्या दुरुस्तीसाठी एकूण ४६ कोटी रुपये निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे नोंदवली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. या पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. नदी, नाले व ओढ्यांना पूर येऊन जमिनी वाहून गेल्या. संततधार पावसामुळे काही भागात घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचीभरपाई देण्यासाठी प्रशासनाने सरकारकडे निधीची मागणी केली आहे. या नुकसानीसोबत जिल्ह्यात सरकारी मालमत्ता व पायाभूत सुविधांचीही मोठी हानी झाली. पावसाने काही भागात पायाभूत सुविधा उद्धवस्त झाल्या. नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खचले. रस्त्यांवरील पूल वाहून गेले तर काही भागात या पुलांनाही बाधा पोचली. यातूनच जिल्ह्यातील एक हजार २४२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी ३४ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपये लागणार आहेत. जिल्हा परिषद तसेच राज्य सरकारच्या अखत्यारितील बांधकाम विभागाने नुकसानीचा अहवाल दिल्यानंतर सरकारने या निधीची मागणी सरकारकडे नोंदवली आहे. अतिवृष्टीने २५४ पुलांचे नुकसान झाले असून या पुलांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी ९३ लाख ५० हजार रुपयांची गरज असल्याचे प्रशासनाने सरकारला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. दोन पाणी पुरवठा योजनांचेही अतिवृष्टीने नुकसान झाले असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी १७ लाखांची मागणीही करण्यात आली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तलाव व शाळांनाही बाधा 
अतिवृष्टीने मोठे पाणी येऊन जिल्ह्यातील ३४ तलाव व प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. काही भागात तलाव फुटण्यासह प्रकल्पांच्या पाळू कमकुवत झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने चार कोटी ३८ लाख ८२ हजार रूपयाची मागणी केली आहे. जिल्ह्यातील तब्बल अकरा जिल्हा परिषद शाळांचेही अतिवृष्टीने नुकसान झाले असून या शाळांच्या दुरुस्तीसाठी नऊ लाख दहा हजार रूपयाची गरज आहे. पंचायत समितीच्या एका सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली असून या मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने पाच लाखाची मागणी केली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

१२४ रोहित्र नादुरुस्त 

वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरणच्या वीज व्यवस्थेलाही धक्का बसला आहे. अतिवृष्टीमुळे १२४ रोहित्र (डीपी) नादुरूस्त झाली असून यात सहा रोहित्र झुकली तर ११६ रोहित्र नादुरूस्त झाली आहेत. उच्चदाब वाहिनीचे १९७ तर लघुदाब वाहिनीचे ३९१ वीजेचे खांब अतिवृष्टीत आडवे झाले आहेत. या वीज व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी महावितरणने ४८ लाख ७० हजार रुपयाच्या निधीची मागणी केली असून त्याचा अहवालही प्रशासनाने सरकारला पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एसडीआरएफ) निकषानुसार सरकारी नुकसानीबाबत निश्चित केलेल्या दरानुसार निधी मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

(संपादन-प्रताप अवचार)