कष्टकरी, निराधारांच्या मदतीसाठी अनेकजण सरसावले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने गरजू, कष्टकरी, निराधारांच्या मदतीसाठी जिल्ह्यात अनेकजण सरसावत आहेत. अन्न, जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.

जालना - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने गरजू, कष्टकरी, निराधारांच्या मदतीसाठी जिल्ह्यात अनेकजण सरसावत आहेत. अन्न, जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.

 

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

अंबड - शहरात जमाते इस्लामी हिंद व अफरोज पठाण मित्रमंडळाच्या वतीने 
गरजूंना, कष्टकरी कुटुंबाला एक महिनाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. किराणा सामानात गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणे, गोडतेल, चहापत्ती, डाळ, मिरची, हळद पावडर, मसाला आदींसह दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंचे वाटप सुरू करण्यात आले आहे. एका रिक्षातून एक स्वयंसेवक शहरातील गरजवंत, गोरगरीब, हातावर पोट असलेल्यांना घरपोच साहित्य वाटप करीत आहे. 

पारडगावात गरजू ग्रामस्थांना साहित्याची मदत 

घनसावंगी -  पारडगाव येथील दिव्यांग, विधवा, तसेच गरजू लाभार्थींना घरपोच मोफत जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गोरगरीब व रस्त्यांवर काम करणाऱ्या कुटुंबांची आर्थिक ओढाताण होत होती. त्यामुळे येथील नजीर कुरेशी व सय्यद अकबर यांनी ही बाब चंद्रभूषण जैस्वाल यांनी सांगितली. त्यांनी लगेच गावातील शंभर कुटुंबीयांना गहू, तांदूळ, साखर, चहा पुडा, गोडेतेल, तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ असे जीवनावश्‍यक साहित्य उपलब्ध करून दिले. या साहित्याचे रविवारी (ता. २९) वाटप करण्यात आले. यावेळी घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवार, तलाठी संजय कुलकर्णी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर, पांडुरंग माने, रंजित खतगावकर, विठ्ठल वायाळ, विष्णू धोतरे यांची उपस्थिती होती. 

परतूर येथे पालेभाज्यांसह फळवाटप 

परतूर - येथील नगरपालिकेचे शिवसेनेचे गटनेते मोहन अग्रवाल यांच्या वतीने गरजूंना मोफत पालेभाज्या व फळांचे वाटप करण्यात आले. मागील आठ दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग रोखला जावा यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. यामुळे कष्टकरी, गरजू नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अग्रवाल यांनी पुढाकार घेत प्रभागात पालेभाज्या व फळे वाटप केली. 

मंठ्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

मंठा -  तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून आपत्कालीन यंत्रणेत काम करणाऱ्या पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार यांच्या संकल्पनेतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, फार्मासिस्ट, परिचारिका व कर्मचाऱ्यांना तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक विलास निकम, अंकुशराव अवचार, संतोष वरकड, प्रल्हादराव बोराडे, श्रीरंग खरात, पप्पू दायमा, तुळशीराम कुहिरे, आकाश कास्तोडे, संदीप अवचार, नवनाथ अवचार, कैलास निर्वळ यांची उपस्थिती होती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping the needy in Jalna district