हिंगोली @ ९१ : दोन दिवसांत ३८ कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

सोमवारी रात्री एसआरपीएफच्या २२ जवानांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात मंगळवारी १५ बाधितांची भर पडली असून आकडा ९१ वर पोचला आहे. 

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एसआरपीएफच्या १५ संशयित रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मंगळवारी (ता. पाच) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. विशेष म्हणजे सोमवारी रात्री एसआरपीएफच्या २२ जवानांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९१ वर पोचला आहे. यात एसआरपीएफच्या ८४ जवानांचा समावेश आहे.

मुंबई व मालेगाव(नाशिक) येथील बंदोबस्‍तावरून आलेल्या १९४ जवानांना खबरदारी म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील काही जवानांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांचे स्वॅब स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 

हेही वाचालॉकडाउनमध्ये जंगलातील पाणवठे कोरडेच...कुठे वाचा

रविवार (ता. तीन) एकही रुग्ण आढळला नाही

यावेळी यातील काही जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, शुक्रवार (ता. एक) व शनिवार (ता. दोन) या दोन दिवसांत ३२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरणाबधितांची संख्या ५३ वर पोचली होती. त्यानंतर रविवार (ता. तीन) एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळला नाही. 

७१ जवानांचे अहवाल निगेटिव्ह

त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला होता. तर मालेगाव (नाशिक) येथून आलेल्या संशयित एसआरपीएफ जवानांपैकी ७१ जवानांचे स्वॅब नमुने अहवाल सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजता निगेटिव्ह आले. या पूर्वीही त्यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे हिंगोली जिल्हावासीयांनी आनंद व्यक्त केला होता.

२४ वर्षीय परिचारिकेला कोरोनाची लागण

 मात्र, हा आनंद औटघटकेचा ठरला. सोमवारी रात्री आलेल्या अहवालाने प्रशासनाची झोप उडविली. यामध्ये एसआरपीएफच्या तब्बल २२ जवानांसह (मुंबई येथे कार्यरत होते.) जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका २४ वर्षीय परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल आल्यानंतर पुन्हा मंगळवारी (ता. पाच) १५ जवान कोरोनाबाधित निघाले. 

तब्बल ८४ जवानांचा समावेश

त्यामुळे जिल्ह्यातील कोरणाबधितांचा आकडा ९१ वर पोचला आहे. यात तब्बल ८४ जवानांसह इतर सात जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा वाढतच असून नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

येथे क्लिक कराहिंगोलीत तळीरामांच्या आशा भंगल्या

चार जवानांना औरंगाबाद येथे हलविले

एसआरपीएफच्या चार जवानांना उच्च रक्तदाब, मधुमेहाची लक्षणे असल्याने त्यांना विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांना कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत. आता एसआरपीएफच्या ८४ जवानांवर उपचार सुरू असून यातील एक जवान हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असून तो जालना येथील एसआरपीएफचा जवान आहे.

एका कोरोनामुक्त रुग्णास सुटी

जिल्ह्यात एकूण ९१ कोरणाबधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण ठणठणीत बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ९० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, हिंगोलीतील रिसाला बाजार भागात राहणाऱ्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याने हा परिसर आता कंटेनमेंट झोन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या हा परिसर सील करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli @ 91: 38 corona Patient in two days Hingoli news