हिंगोलीला दोन वर्षांनंतर मिळाले अतिरिक्त सीईओ...  

राजेश दारव्हेकर 
Thursday, 3 September 2020

दोन वर्षांपूर्वी येथील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांची जालना येथे मूळ पदावर बदली झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर मागील एक वर्षांपासून हिंगोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.मिलिंद पोहरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. आता नव्याने बुधवारी निघालेल्या आदेशात हिंगोलीला दोन वर्षांनंतर अतिरिक्त सीईओ मिळाले आहेत. 

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी दोन वर्षांनंतर अधिकारी मिळाल्याने कर्मचाऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. 

दोन वर्षांपूर्वी येथील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांची जालना येथे मूळ पदावर बदली झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर मागील एक वर्षांपासून हिंगोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.मिलिंद पोहरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यामुळे कामकाजाला गती मिळाली होती. 

हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या ३६ कर्मचाऱ्यांची अँटीजेन तपासणीत चार जण पॉझिटिव्ह

बुधवारी निघाले आदेश 
राज्य शासनाने आज सेवा गट ‘अ’ मधील चार अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारीपदी यामध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. एस. शेंगुलवार यांची नियुक्ती केली आहे. तर सोलापूर येथील जिल्हा परिषदेचे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. ए. जी. नवाळे यांची उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागपूर येथील जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी.पी.जाखलेकर यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. याशिवाय सिल्लोड येथील गटविकास अधिकारी पी.ए. दाभाडे यांची औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या रिक्तपदी मूळ पदावर नियुक्ती झाली आहे. 

हेही वाचा - नांदेड : परभणीतून फरार झालेल्या कैद्याला भोकर पोलिसांकडून अटक

अनेक वर्षांपासून प्रभारीवरच कारभार 
हिंगोली जिल्हा परिषदेला अनेक रिक्त पदांचे ग्रहण लागले असून, अनेक वर्षांपासून प्रभारीवरच कारभार सुरू आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपद हे मागील दोन वर्षांपासून रिक्त असताना आता अधिकारी मिळाला आहे. तर महिला बालकल्याण, समाजकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, यासह आरोग्य विभागातील; तसेच विस्तार अधिकारी असे शेकडो पदे अद्यापही रिक्त असल्याने ही पदे कधी भरली जाणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. प्रभारींवरच कामकाज सुरू असल्याने अधिकाऱ्यांना कामकाज करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli gets additional CEO after two years ..., Hingoli News