हिंगोली : विविध  देवींच्या मंदिरात उद्या होणार घटस्थापना, नवरात्र महोत्सव साध्या पद्धतीने

राजेश दारव्हेकर
Friday, 16 October 2020

जिल्ह्यात अनेक गावात देवीची मंदिरे आहेत. या मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो.

हिंगोली :  जिल्ह्यात अनेक गावात देवीची मंदिरे आहेत. या मंदिरात दरवर्षी साजरा होणारा नवरात्रोत्सव यावर्षी कोराना संकटामुळे साध्या पध्दतीने साजरा केला जाणार आहे. शनिवारी (ता. १७) घटस्थापना केली जाणार आहे.

जिल्ह्यात अनेक गावात देवीची मंदिरे आहेत. या मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. नऊ दिवसात घटस्थापना, सकाळ, सायंकाळी आरती, प्रसाद वाटप, जागर गोंधळ, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, किर्तन, देवीचे पाठ, होमहवन, महाप्रसाद, ओटी भरण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. यामुळे ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.

देवीच्या मंदिरात शनिवारी घटस्थापना केली जाणार

यावर्षी मात्र कोरोना स़ंकट व अद्यापही मंदिरे उघडण्यात आली नसल्याने तसेच नवरात्रात मंदिरात होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमास बंधने आल्याने देवीच्या मंदिरात होणारे सर्व कार्यक्रम साध्या पध्दतीने मंदिरात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून केले जाणार आहेत. जिल्ह्यात असलेल्या व विविध नावाने ओळख असलेल्या देवीच्या मंदिरात शनिवारी घटस्थापना केली जाणार आहे.

हेही वाचा नांदेड : तृतीयपंथीयांनी फोडला आयुक्तांसमोर टाहो, काय आहे कारण ? -

नवरात्र महोत्सव साध्या पध्दतीने भाविकाविना साजरा केला जाणार आहे.

जिल्ह्यात असलेली देवीची मंदिरे यात कळमनुरी तालुका  डोंगरगाव पुल येथील जगदंबा देवी, वारंगा फाटा जगदंबा देवी, किल्लेवडगाव जगदंबा देवी, वसमत तालुका कुरुंदा येथील टोकाईदेवी, आंबा येथील आंबामाता, आरळ येथील देवी, औंढा तालुका औंढा येथील पदमावती, सेनगाव तालुका माझोड येथील रेणुका माता, हिंगोली तालुका घोटा येथील घोटादेवी, बोराळा येथील रेणुका, नांदुरा येथील देवी, हिंगोली शहरातील तुळजाभवानी, सातदेवी, चौदादेवी अशी महत्त्वाची मंदिरे आहेत. यासह अनेक गावात देवीची मंदिरे आहेत. येथे नवरात्र महोत्सव साध्या पध्दतीने भाविकाविना साजरा केला जाणार आहे.

टोकाईदेवी गडावर देखील साधेपणाने कार्यक्रम होणार

हिंगोली तालुक्यातील घोटा येथील घोटादेवी येथे नवरात्रात दररोज भाविकांची मोठी गर्दी असते येथे धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते येथे कोजागिरी पोर्णिमेपर्यंत कार्यक्रम असतात. सेनगाव तालुक्यातील माझोड येथील रेणुका माता मंदीरात नवरात्र महोत्सवाची  साधेपणाने कार्यक्रम होणार आहेत. कुरुंदा येथे उंच माळरानावर असलेल्या टोकाईदेवी गडावर देखील साधेपणाने कार्यक्रम होणार आहेत. 

येथे क्लिक करा -  कोरोना इफेक्ट : वजनकाट्यातून होतेय ग्राहकांची आर्थिक फसगत

मंदिरात घटस्थापना करून साधेपणाने कार्यक्रम

जिल्ह्यातील सर्वच देवीच्या मंदिरात दरवर्षी  नवरात्रात देवीच्या दर्शनाला येणा-या भावीका साठी दररोज फराळाची व्यवस्था करण्यात  येते. यासह प्रसादाचे  वाटप दिवस भर सुरू असते.  फराळाची व्यवस्था वेगवेगळ्या गावातील अन्नदात्यानी केलेली असते. मात्र या वर्षी वाढत्या कोरोना मुळे मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमावर बंधन आल्याने नवरात्रात होणारे सर्व कार्यक्रम भाविकाविना होणार असल्याचे संस्थानतर्फे सांगण्यात आले आहे. या मंदिरात घटस्थापना करून साधेपणाने कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Marriage will be held tomorrow in the temples of various goddesses, Navratra festival will be held in a simple manner hingoli news