हिंगोली- नांदेड महामार्गावरील अपघातसत्र थांबेना

विनायक हेंद्रे
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

नांदेड ते वारंगा फाटा या मार्गाचे दुहेरीकरण झाले असले तरी वारंगा फाटा ते हिंगोली मार्ग अजूनही अरुंदच आहे. या मार्गाचे लवकरच चौपदरीकरण होणार असले तरी सध्या तरी हा मार्ग धोकादायक बनला आहे. जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.

आखाडा बाळापूर (जि.हिंगोली) : हिंगोली ते नांदेड या महामार्गाची दुरवस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. यातील आखाडा बाळापूर ते वारंगा फाटा दरम्यानचा मार्ग तर अपघाताला निमंत्रण देत असून दीड महिन्यात एकाच जागेवर तब्बल दहा ट्रक उलटल्याच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी (ता. १७) कुर्तडी पाटीजवळ सरकीने भरलेला ट्रक उलटून अपघात घडला आहे.

हैदराबाद, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर जिल्ह्याला जोडणारा म्हणून हिंगोली-नांदेड महामार्ग ओळखला जातो. याच मार्गावरून पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आध्रप्रदेश आदी राज्यांत मालवाहतूक होते. त्यामुळे या मार्गावरून रात्रंदिवस हजारो वाहने धावतात. नांदेड ते वारंगा फाटा या मार्गाचे दुहेरीकरण झाले असले तरी वारंगा फाटा ते हिंगोली मार्ग अजूनही अरुंदच आहे. या मार्गाचे लवकरच चौपदरीकरण होणार असले तरी सध्या तरी हा मार्ग धोकादायक बनला आहे. जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याची चाळणी झाली आहे. 

हेही वाचात्वरीत पैसे मिळण्यासाठी  जाचक अटीला शेतकऱ्यांचा ‘खो’

रात्रीचा प्रवासच होतोय बंद

त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहने उलटण्याचे प्रमाणही वाढले आहे. जीवितहानी झाली नसली तरी वाहन व मालाचे मोठे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी तर अनेक जण या मार्गावरून प्रवासच टाळत आहेत. यातील वारंगा फाटा ते आखाडा बाळापूर दरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. दररोजच छोटी वाहने उलटण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, मागील एक महिन्यापासून तर मालवाहतूक करणारी मोठी वाहनेही उलटत आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटत आहे. यातून अपघात घडत आहेत. 

दीड महिन्यात दहा ट्रक उलटले

दीड महिन्यात एकाच ठिकाणी तब्बल दहा ट्रक उलटल्याचे प्रकार घडले आहेत. सोमवारी (ता. १७) कुर्तडी पाटीजवळ सरकीने भरलेला ट्रक उलटून अपघात घडला आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या बाबत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात मागणीही करण्यात आली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

येथे क्लिक करा - ‘सिध्देश्वर’चे पाणी ‘पुर्णे’च्या पात्रात

अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन

भोकर येथील महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी खड्डे बुजविण्यासंदर्भात चर्चा केली आहे. लवकरच खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले असले तरी एक महिना झाला तरी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. लवकरच खड्डे बुजवावेत, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल.
- सोपान पाटील बोंढारे, शिवसेना उपजिल्हा संघटक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli - Nanded highway on no stop accident serial