हिंगोली अर्बन ट्रस्‍ट आले मदतीला धावून

राजेश दारव्हेकर
Sunday, 19 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने जागोजागी बंदोबस्‍त लावला आहे. आरोग्य कर्मचारीदेखील रात्रंदिवस काम करीत आहेत. हिंगोली अर्बन ट्रस्‍टचे जयेश खर्जुले यांनी पुढाकार घेत दहा ते पंधरा दिवसांपासून कोरोना योद्धांसाठी जागेवरच नास्‍त्‍याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. शहरात कर्तव्यावर काम करणारे पोलिस कर्मचारी, जवान, आरोग्य कर्मचाऱ्यांना हिंगोली अर्बन ट्रस्‍टतर्फे दररोज सकाळी नास्‍ता दिला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने जागोजागी बंदोबस्‍त लावला आहे. आरोग्य कर्मचारीदेखील रात्रंदिवस काम करीत आहेत. त्‍यांना सकाळ ते सायंकाळ कर्तव्यावरच राहावे लागत असल्याने वेळवेर जेवण, नास्‍ता मिळणे कठीण बनले आहे.

हेही वाचाहिंगोलीचे भूमीपुत्र देताहेत मोफत आरोग्य सेवा

जयेश खर्जुले यांचा पुढाकार

यासाठी अन्नदानात नेहमी पुढाकार घेणारे हिंगोली अर्बन ट्रस्‍टचे जयेश खर्जुले यांनी पुढाकार घेत दहा ते पंधरा दिवसांपासून कोरोना योद्धांसाठी जागेवरच नास्‍त्‍याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाउन संपेपर्यत हा उपक्रम सुरूच ठेवला जाणार असल्‍याचे हिंगोली अर्बन ट्रस्‍टचे अध्यक्ष जयेश खर्जुले यांनी सांगितले. 

दरवर्षी भाविकांना अन्नदान

दरम्‍यान, श्री. खर्जुले हे विविध मंदिरात वर्षभर अन्नदान करतात. यासह शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या आषाढी एकादशीच्या पालखी सोळ्यातील सहभागी भाविकांना दरवर्षी डिग्रसपाटी येथे नास्‍त्‍याची व्यवस्‍था करतात. ट्रस्‍टतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळेत देखील रोटी बँकेचा उपक्रम राबविला जातो.

उज्‍ज्वल महिला ग्रामसंघातर्फे गरजूंना मदत

पोतरा : कळमनुरी तालुक्‍यातील पोतरा येथे जीवननोन्नती अभियानांतर्गत उज्‍ज्वल महिला ग्रामसंघातर्फे शनिवारी (ता.१८) गावातील दहा गरजू महिलांना अन्नधान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. जीवननोन्नती अभियानांतर्गत गावातील बचत गटांतर्गत उज्‍ज्वल महिला ग्रामसंघाची स्‍थापना करण्यात आली आहे. 

येथे क्लिक कराव्हिडिओ: संत नामदेव महाराज मंदिरात घुमतोय हरिनामाचा गजर

मास्‍कचे मोफत वाटप

त्‍यांना मिळालेल्या रकमेतून उज्‍ज्वल ग्रामसंघाने गरजूंना गहू, तांदूळ, साखर, खाद्यतेल, मीठपुडा, चटणी, हळद आदी खाद्यवस्‍तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी सोनाली रणवीर, वर्षा मसुरे, मीनाबाई चेभेले, शांता रणवीर, शिवकन्या राऊत, चतुरा राऊत आदींची उपस्थिती होती. दरम्यान, मीनाबाई चेभेले व वर्षा मसुरे यांनी घरीच मास्‍क करून त्‍याचे गावात मोफत वाटप केले. याउपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक केले जात आहे. 

मधोमती विद्यालयात पोषण आहाराचे वाटप

हिंगोली : औंढा तालुक्‍यातील लाख येथील मधोमती विद्यालयात विद्यार्थ्यांना शनिवारी (ता. १८) पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्‍थाध्यक्ष माणिकराव लोंढे, प्राचार्य एम. आर. खचकड, टी. जी. रांजणे, एस. एस. लोंढे, पी. पी. जाधव, श्री. घुगे, आर. झेड. भिसे, एम. पी. पोले, एन. एन. काळे, पी. व्ही. रणखांब यांची उपस्‍थिती होती. या वेळी सोशन डिस्टन्स पाळण्यात आला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Hingoli Urban Trust came in to help Hingoli news