esakal | लई भारी! होळीला जावयाला चपलांचा हार, गाढवावरून गावभर स्वारी
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

धूलिवंदनाच्या काही दिवस अगोदर जावई शोधून त्याचा अज्ञातस्थळी पाहुणचार केला जातो; मात्र कोणता जावई गळाला लागला याची गुप्तता पाळण्यात येते. धूलिवंदनाच्या दिवशी सकाळी गळ्यात चपलांचा हार घातलेल्या गाढवावर बसवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते.

लई भारी! होळीला जावयाला चपलांचा हार, गाढवावरून गावभर स्वारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केज (बातमीदार) : तालुक्यातील विडा येथे धूलिवंदन साजरी करण्याची आगळी-वेगळी परंपरा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची ही साधारणतः ऐंशी वर्षांपासूनची परंपरा अद्यापही अखंडित सुरू आहे. इतर वेळी जावयाचा थाट असतो. या दिवशी मात्र गावच्या जावयाची गाढवाच्या गळ्यात चपलांचा हार घालून रंगांची उधळण करीत वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते.

येथील धूलिवंदनाचा उत्सव सर्वांसाठी आनंद देऊन जातो. या उत्सवात गावातील सर्व जातिधर्माचे नागरिक सहभागी होतात. होळी सणाची चाहूल लागताच विडेकर जावयाच्या शोधात आहेत. यावर्षी गर्दभ स्वारीचा मान कोणत्या जावयास मिळतो, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

होळीचा सण आल्याने दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धूलिवंदनाच्या उत्सवासाठी जावई शोधण्याची मोहीम विडेकरांनी हाती घेतली आहे. यावर्षीचा जावई पकडण्यासाठी तरुणांच्या तुकड्यांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. या गावचे अनेक जावई भूमिगत झाले आहेत.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

मागील काही वर्षांपासून गावात गाढव नसल्याने गाढव भाड्याने आणण्याची वेळ आली आहे. ही परंपरा त्याकाळचे ठाकूर आनंदराव देशमुख यांचे जावई होळीच्या दिवशी सासुरवाडीत आले असता, त्यांना ग्रामस्थांनी धूलिवंदनाच्या दिवशी थट्टेने गाढवावर बसविले होते. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आहे. 

कोणता जावई गळाला लागला याची गुप्तता

धूलिवंदनाच्या काही दिवस अगोदर जावई शोधून त्याचा अज्ञातस्थळी पाहुणचार केला जातो; मात्र कोणता जावई गळाला लागला याची गुप्तता पाळण्यात येते. धूलिवंदनाच्या दिवशी सकाळी गळ्यात चपलांचा हार घातलेल्या गाढवावर बसवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत गावातील सर्व जातिधर्माचे नागरिक सहभागी होतात. महिला देखील घराच्या छतावरून ही मिरवणूक पाहण्याचा आनंद घेतात. 

लातूरला कधी होणार चिकन महोत्सव

गावभर मिरवणूक काढून हनुमान मंदिरात जावयास कपड्यांचा आहेर चढवून त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला जातो. तर त्याच्या सासऱ्यांकडून सर्व इच्छेने सोन्याची अंगठी भेट दिली जाते. हा उत्सव पाहण्यासाठी दूरवरून आलेले लोक हळूहळू आपल्या गावी गेल्यावर मात्र गावं कसं शांत झाल्याचा भास होतो. यावर्षी मंगळवारच्या (ता. दहा) गर्दभ स्वारीचा मानकरी कोण असणार, याची तरुणांत जोरदार चर्चा सुरू आहे.