मंठा तालुक्यात ८२ जणांना होम क्वारंटाइन 

कृष्णा भावसार
गुरुवार, 26 मार्च 2020

शहरी भागातून साडेतीन हजार जण गावाकडे परतलेले आहेत. प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून सर्दी-खोकला-ताप असलेल्या ६३ जणांवर औषधोपचार करण्यात आले. असून त्यांची प्रकृती चांगली आहे. तर ८२ जणांना औषधोपचार करून विलगीकरणाच्या सूचना दिल्या आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपक लोणे यांनी सांगितले.

मंठा ( जि.जालना) - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित रुग्ण तालुक्यात अद्याप आढळून आलेला नाही. तरीही शासनस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात शासकीय यंत्रणा जोमाने काम करीत आहे. शहरी भागातून परतलेल्या तालुक्यातील ८२ जणांना औषधोपचार करून विलगीकरणाच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

तालुक्यात मुंबई पुणे व इतर मोठ्या शहरातुन गुरुवारपर्यंत ( ता. २६) शहरी भागातून साडेतीन हजार जण गावाकडे परतलेले आहेत. प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून सर्दी-खोकला-ताप असलेल्या ६३ जणांवर औषधोपचार करण्यात आले. असून त्यांची प्रकृती चांगली आहे. तर ८२ जणांना औषधोपचार करून विलगीकरणाच्या सूचना दिल्या आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपक लोणे यांनी सांगितले.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

विलगीकरणाच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. तसेच प्रत्येकाने कोरोनाच्या धास्तीने घाबरून न जाता सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखवून काळजी घ्यावी. तसेच बाहेरून घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्यावेत, असे आवाहनही डॉ.दीपक लोणे यांनी केले आहे. 

अनेक कुटुंब परतलेय गावाकडे 

तालुक्यातील अनेक कुटुंब नोकरी व कामधंद्याच्या शोधात मोठ्या शहरात स्थलांतरित झाले आहेत. कोरोना विषाणूच्या धास्तीने अनेक कुटुंब गावाकडे परतत आहेत. तालुक्यातील मुंबई, पुणे तसेच इतर मोठ्या शहरातून गावात येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्याचा ग्रामस्थ आग्रह करीत आहेत.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य विभागामार्फत अंगणवाडी सेविका व आशा यांच्यामार्फत घरोघर जाऊन गावात कोणी नवीन आले आहे काय, कोणाला सर्दी-खोकला-ताप आहे काय याबाबत चौकशी करून संशयित आढळल्यास आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे. 

तीन ठिकाणी विलगीकरण कक्ष 

सर्व भौतिक सुविधा असलेल्या कस्तुरबा गांधी विद्यालय, कस्तुरबा गांधी वस्तीगृह व मॉडेल इंग्लिश स्कूल या तीन ठिकाणी विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, गटविकास अधिकारी संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी दीपक लोणे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश कुळकर्णी यांनी गुरुवारी ( ता. २६ ) कक्षाची पाहणी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home quarantine to eighty two people in Mantha