महत्त्वाची बातमी : दिवाळीपर्यंत घरातच भरणार शाळा...

latur news
latur news

लातूर : ‘कोरोना’चा मुक्काम आणखी किती दिवस आहे, हे सध्या कोणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे शाळा पूर्वीसारख्या नियमित सुरू होणार की नाही? हा प्रश्न विद्यार्थी-पालकांबरोबरच शाळांसमोरही उभा ठाकला आहे. यावर उत्तर शोधत शहरातील काही स्मार्ट शाळांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मुलांना दिवाळीपर्यंत घरातच राहून शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. शाळेचे स्वतंत्र ॲप तयार करण्यापासून ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ विकसित करण्यापर्यंतचे नियोजन शाळांत सध्या सुरू आहे.

‘कोरोना’चा फैलाव होऊ नये म्हणून शाळा-महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण यापुढे कोरोनाच्या प्रादुभार्वाची स्थिती कशी राहिल, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे शाळांनी दहावीच्या उन्हाळी वर्गाची आणि नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू केली आहे. तर काही शाळांची ऑनलाईन माध्यमातून मुलांना शिकवण्याची तयारी पूर्णही झाली आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत मुलांना घरी बसून शिकण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याआधीच सरकारने नियमित शाळा सुरू करण्याच्या सुचना दिल्या तर घरी बसून शिकण्याचा पर्याय बाजूला ठेवण्याची तयारीही शाळांनी दर्शवली आहे.

संत तुकाराम स्कूलचे प्राचार्य बी. ए. मैंदरगे म्हणाले, जुन-जुलैमध्ये शाळा सुरू होतील, याची शक्यता कमी आहे. शाळा सुरू झाल्या तर मुलांना शाळेत अर्थात गर्दीत पालक पाठवण्याची तयारी दाखवणार नाहीत. या बाबींचा विचार करून आम्ही व्हर्च्युअल क्लासरूम विकसित करत आहोत. शिक्षक शाळेत येऊन शिकवतील. पण, मुलांना हे घरबसल्या मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉपवरून ऐकता आणि पाहता येईल. हे नियोजन आम्ही शाळेतील सर्व इयत्तांसाठी सप्टेबर महिन्यापर्यंत करत आहोत.

ज्ञानप्रकाश विद्यानिकेतनचे सतिश नरहरे म्हणाले, सध्या दहावीच्या मुलांना झुम ॲपच्या माध्यमातून शिकवले जात आहे. हा एक नवा अनुभव आहे. सध्या त्यात फारशा अडचणी नाहीत. अशा वेगवेगळ्या अत्याधुनिक मार्गाने शाळेत सर्वच इयत्तांच्या मुलांना शिकवण्यात येणार आहे. व्हर्च्युअल क्लासरूमचाही विचार सध्या सुरू आहे.

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी म्हणाले, बंकटलाल इंग्लिश स्कूल आणि राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये ऑनलाईन शिक्षणाला सुरवात झाली आहे. या शाळांतील मुले घरी बसून शिक्षण घेत आहेत. तर गोदावरी मुलींचे विद्यालय, पुरणमल लाहोटी विद्यालय, राजस्थान विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळांतही लवकरच याची सुरवात होईल. पण या माध्यमातून मुलांना किती महिने शिकवायचे, हे परिस्थितीवर अवलंबून राहिल. देशिकेंद्र शाळा आणि झी स्कुलमध्ये शाळेच्या नावाचे स्वतंत्र ॲप विकसित करण्याचे काम सुरू आहे.

‘देशिकेंद्र’च्या मुख्याध्यापिका एस. के. कल्याणी म्हणाल्या, शाळा सुरू करण्याच्या सूचना जोपर्यंत मिळणार नाहीत, तोवर या ॲपच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाईल. अंकूर बालविकास केंद्राच्या शाळांमध्ये व्हॉट्‌स ॲपचे वेगवेगळे ग्रुप तयार करून मुलांना शिकवण्यास सुरवात झाली आहे, असे शाळेतर्फे मुख्याध्यापक व्यकंट दापेगावकर यांनी सांगितले.

‘झूम’वर शाळांची फुली

कोरोनामुळे जवळ येऊ नका, गर्दी करू नका असे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक कार्यालयातील बैठकासुद्धा झूम या ॲपवरून होत आहेत. अनेक राजकीय नेतेसुद्धा हे ॲप वापरताना दिसत आहेत. शाळांनाही मुलांना शिकवण्यासाठी हे ॲप वापरायला सुरवात केली होती. मुलांना घरबसल्या शिकायला मिळत होते. मात्र, सरकारने हे ॲप सुरक्षित नाही, असे सांगितल्याने शहरातील अनेक शाळा या ॲपमधून बाहेर पडल्या आहेत. याबाबतचा अनुभव संत तुकाराम स्कूल, झी स्कूल, अंकुर बालविकास केंद्र यासह इतर शाळांनी सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com