कोरोना बळींबाबत रुग्णालये ठेवताहेत प्रशासनाला अंधारात?

उमेश वाघमारे 
Friday, 7 August 2020

जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी दिवसरात्र एक करीत घाम गाळत आहेत. असे असताना सिव्हिलसह खासगी रुग्णालये मात्र कोरोना बळींबाबत प्रशासनाला अंधारात ठेवत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सोयीप्रमाणे कोरोना बळींची माहिती प्रशासनाला कळविली जात आहे.

जालना - कोरोना संकटाला प्रत्येकाला तोंड देण्याची वेळ आली आहे. त्यातच जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी दिवसरात्र एक करीत घाम गाळत आहेत. असे असताना सिव्हिलसह खासगी रुग्णालये मात्र कोरोना बळींबाबत प्रशासनाला अंधारात ठेवत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सोयीप्रमाणे कोरोना बळींची माहिती प्रशासनाला कळविली जात आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनावर कामाचा अधिक ताण पडत आहे. ही परिस्थिती संपूर्ण राज्यातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आली आहे. मात्र, कोरोनाचा कहर मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहे. तर शहरातील ११ खासगी रुग्णालयांत महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

बाधितांचे मृत्यू झाल्यास ही माहिती शासनस्तरावर तत्काळ देणे बंधनकारक आहे. मात्र असे असताना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ता. १९ जुलै व ता. २० जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दोन पुरुषांची माहिती व एका खासगी हॉस्पिटलमध्ये ता. २६ जुलै व ता. एक ऑगस्ट रोजी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दोन महिलांची माहिती जवळपास दडवूनच ठेवली. गुरुवारी (ता. सहा) ही माहिती दोन्ही रुग्णालयांनी प्रशासनाला दिली. विशेष म्हणजे संबंधित खासगी हॉस्पिटलने बुधवारी एका बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर पूर्वीची व नवीन अशी एकत्रित माहिती कळविली. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाला तत्काळ देणे अपेक्षित आहे. परंतु एका खासगी हॉस्पिटलने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती वेळेत दिली नाही. त्यामुळे त्याना नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाकडूनही कोरोनाबाधित मृतांची माहिती का उशिरा देण्यात आली, याची विचारणा करण्यात येईल. 
- रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना. 

 

(संपादन : संजय कुलकर्णी)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hospital not provide timely information to district administration