टाळ्या, थाळ्या वाजविल्या आणि देवमाणसांनी दरवाजेच बंद केले 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

  • -ग्रामीण भागात खासगी दवाखाने बंद असल्याने हाल 
  • काही प्रमाणात शहरांतही प्रकार; समाजमाध्यमांतून संताप 
  • दवाखाने बंद ठेवले तर परवाने रद्द : जिल्हाधिकारी

बीड -  देवानंतर कोण, तर डॉक्टर. देव जन्म देतो आणि डॉक्टर वाचवितो म्हणून डॉक्टरांना ‘देवमाणूस’ म्हणतात. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूमध्ये आम्ही घरात आणि तुम्ही लढत आहात म्हणून आम्ही टाळ्या, थाळ्या वाजवून तुमच्याबद्दल कृतज्ञ भावना व्यक्त केली. या घटकाचा आदरही समाजमनात वाढला. परंतु, संचारबंदीच्या कठीण काळात या मंडळींनी आपल्या दवाखान्यांचे दरवाजे बंद करून नेमके काय साध्य केले, असा प्रश्न पडत आहे.

ग्रामीण भागात असे सर्रास चित्र असून शहरी भागांतही काही प्रमाणात आहे. आता तर कुठे संचारबंदी असून कोरोना विषाणूचा फैलाव झालेला नाही. त्या कठीण काळात तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात, अशा भावनाही समाजमनातून व्यक्त होत आहेत. आजही जिल्ह्यातील शेकडो डॉक्टर व हजारो नर्स आपली सेवा चोख बजावत असून, त्यांच्याबद्दल आणखी आदर वाढत आहे.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

काही प्रमाणात खासगी आणि ग्रामीण आरोग्य सेवेतील मंडळींना या कठीण काळाचे आणि समाजमनातील कृतज्ञ भावनेची कदर नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, दवाखाने बंद ठेवून सेवा दिली नाही तर दवाखान्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. परंतु, अशी वेळच का यावी असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून व्यक्त होत आहेत. 

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

सध्या संचारबंदीमुळे वाहतूक पूर्णत: ठप्प आहे. पूर्वीप्रमाणे खेड्यात वैद्यकीय सेवा मिळाली नाही तर वाहन करून शहरात जाण्याची सोय नाही. अशावेळीच या मंडळींनी कातडी बचावचा पवित्रा घेतला आहे. भले त्यांच्याही काही अडचणी आणि मागण्या असल्या तरी ही वेळ अशी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याची नाही, याची त्यांनाच जाणीव असायला हवी, अशाही पोस्ट समाजमाध्यमांतून फिरत आहेत. 

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

एरव्ही खेड्यांमध्ये स्वत:ची पॅथी सोडून सर्रास ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करूनही गावकरी त्यांना पदराआड घेतात. परंतु आता गावकऱ्यांची वाईट वेळ आणि त्यांना आरोग्यसेवेची गरज असताना ही मंडळी खुशाल घरात बसून आहेत. कायद्याने त्यांना प्रवास आणि दवाखाना उघडा ठेवता येत असतानाही त्यांनी चक्क टाळे ठोकल्याचे चित्र आहे. शहरातही काही प्रमाणात असे चित्र आहे. तुम्ही देवमाणूस आहात याची समाजमनाला जाणीव झालेली असतानाच पुन्हा असे प्रकार घडत असल्याने संतापही व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hospitals closed in Beed district