
Human Trafficking : मुलांना पळवून विक्री करणारी आंतरराज्य टोळी गजाआड
परभणी : पैश्यासाठी मुलांना पळवून त्यांना आंध्रप्रदेशात लाखो रुपयांना विक्री करणाऱ्या आतंरराज्य टोळीला परभणी पोलिस दलातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक पथकाने सोमवारी (ता.सहा) आंध्रप्रदेशातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एका मुलास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अजूनही अनेक आरोपी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
परभणी येथील कोतवाली पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या अजमेर कॉलनी येथील रहिवाशी मो. युसूफ मो. हैदर यांनी त्यांच्या मुलांचे ता. ६ फेब्रुवारी रोजी अपहरण झाल्याची तक्रार कोतवाली पोलिसांकडे दिली होती.
तसेच ता. १ मार्च रोजी अशीच एक तक्रार सफिया बेगम अर्शद खान या महिलेने दिली होती. तिचाही आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले असल्याचे तिने सांगितले. या दोन्ही गंभीर प्रकरणाचा तपास पोलिस अधिक्षक रागसुधा. आऱ. यांनी अनैतिक मानवी तस्करी विभाग (एएचटी युनिट) कडे सोपविला.
या कक्षाच्या फौजदार राधिका भावसार, पोलिस अमलदार शेख शकील अहमद, श्री. किरडे, श्री. शिरसकर व श्री. शेळके यांनी या गुन्ह्याचा कसोसीने तपास केला. सतत एक महिना या प्रकरणातील संशयीत आरोपींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
यात अजमेरी कॉलनी येथील महिला सुलताना उर्फ परवीनबी शेख सादेक अन्सारी हिने हे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. तिला तिची बहिण नुरजहा बेगम महंमद इब्राहीम शाकेर व एका विधीसंघर्ष बालकाची मदत मिळाली.
या तिघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता. हे काम हैदराबाद येथील गिता व तिचा पती समीर उर्फ भुऱ्या (रा.जमजम कॉलनी, परभणी) यांचेलंगण्यावरून केल्याचे तपासात समोर आले. अपहरण केलेल्या दोन्ही बालकांना सिकंदराबाद येथे राहत असलेल्या संगिता हिच्या घरी आणण्यात आले. त्यानंतर तिथे एका दुसऱ्या इसमाकडे या मुलांना सोपविण्यात आले. त्या मुलांना एंजटामार्फत विक्री करण्यात आले.
८० हजारापासून ५ लाखा पर्यंत मुलांची विक्री
ठिक ठिकाणावरून पळवून आणलेल्या मुलांची ८० हजारापासून ते ५ लाखापर्यंत विक्री केली जात होती. त्यासाठी अपहरण झालेल्या मुलांचे बनावट आधार कार्डही व बॉन्ड तयार केले जात असतं. ज्यांना मुले होत नाहीत अश्या व्यक्तींना ही मुले विक्री केली जात होती. या प्रकरणात परभणीतील कोतवाली पोलिस ठाण्यातंर्गत दोन व लातूर येथील एका प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
- रागसुधा आर. पोलिस अधिक्षक, परभणी
या प्रकरणात सहा आरोपी हे परभणीतील रहिवाशी आहेत. त्यात नुरजहा बेगम महमद इब्राहीम शाकेर, परवीन बी सादेक अन्सारी, शेख समीर शेख सरवर, शेख चांद पाशा शेख सैलानी, राजेंद्र नरेश रासकटला, सय्यद मजहर अली सय्यद मोहमद अली हे आहेत. तर पडेला श्रावणी, एम.रणजीत प्रसाद, संगिता पांचोली, नामीला सुर्या मांगया व इरगा दिंडला शिल्पा हे हैदराबाद व विजयवाडा येथील आहेत.