esakal | ढोकीत धक्कादायक घटना : ट्रक घुसला घरात, पती-पत्नीचा चिरडून मृत्यू, सहा जण जखमी  
sakal

बोलून बातमी शोधा

dhoki accodent.jpg

दिवाळीच्या या काळात सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. ढोकी पेट्रोलपंपाच्या चौकाजवळ राहत असलेल्या सुरवसे कुटुंबियातही आनंदी आनंद. रात्रीच्या नऊ वाजता सगळ्यांचे जेवण झाले. निवांत झोपण्याची तयारी करीत असताना त्या घरावर अचानक काळाने घाला घातला. बेधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाने सुरवसे यांच्या घरावरच ट्रक घातला. त्यात सुरवसे कुटुंबियातील पती पत्नीचा जाग्यावरच मृत्यू झाला.

ढोकीत धक्कादायक घटना : ट्रक घुसला घरात, पती-पत्नीचा चिरडून मृत्यू, सहा जण जखमी  

sakal_logo
By
राजेंद्र पाटील

ढोकी (उस्मानाबाद) : लातूर-पुणे रोडवरील ढोकी पेट्रोल पंपाच्या चौकापासून काही अंतरावर असलेल्या रोडलगतच्या घरात नंबर नसलेला तेर ते लातूरकडे जाणारा टिप्पर (ट्रक)  घुसून प्रकाश बाबुराव सुरवसे (वय60) मुद्रिका प्रकाश सुरवसे (वय 55) या दाम्पत्याचा जाग्यावर मृत्यू झाला. तर अन्य सहा जण जखमी झाले. त्यांना बार्शी, उस्मानाबाद, सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही भीषण घटना सोमवारी (ता.दहा) रात्री साडेदहा वाजता ढोकी पेट्रोल पंपाच्या नजीक घडली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पवन निंबाळकर रा.आळणी यांचा नंबर नसलेला टिप्पर एक अज्ञात चालक तेरकडून लातूरकडे घेऊन जात होता. त्यावेळी ढोकी चौकावळ आल्यानंतर या ठिकाणी चालकाचा ताबा सुटलेला होता. या चौकात असलेल्या दहा ते पंधरा लोकांच्या अंगावर तो जात होता. अखेर चालकाचा ताबा पुर्णपण सुटल्याने तो ट्रॅक थेट चौकापासून काही अंतरावर असलेल्या उजव्या बाजू कडील प्रकाश बाबुराव सुरवसे यांच्या घरावर धडकला. यावेळी प्रकाश व त्याची पत्नी मुले जेवण करून झोपण्याच्या तयारीत होती. मात्र अचानक हा टिप्पर त्यांच्या अंगावर कसा गेला हा त्यांनाही कळले नाही. यात ते सुरवसे दाम्पत्य जाग्यावर ठार झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हा अपघात होताच पेट्रोलपंप चौकात असलेल्या लोकांना मदतीसाठी धाव घेतली. ट्रकखाली अडकलेल्या पती-पत्नीला बाजूला काढले. व जखमी लहान मुले यांना बाजूला काढले. जखमीमध्ये अक्षदा प्रल्हाद सुरवसे (वय15),  अक्षय गणपत सुरवसे (वय10), आकाश गणपत सुरवसे (वय6), गणपत प्रकाश सुरवशे (वय32), लाला बाप्पा पवार (वय25), गणेश उत्तम शिंदे (वय22) यांना खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे व त्यांचे सर्व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दिवाळीचा सण तोंडावर आला. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, अशा परिस्थितीत सुरवसे कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. या घटनेने संपुर्ण ढोकी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


चालक होता दारुच्या नशेत
नंबर नसलेला ट्रक टिप्पर चालक हा दारुच्या नशेत असल्याचे प्रथमदर्शनी लोकांनी सांगीतले. कारण हा भीषण अपघात होण्याआधी ट्रकचालक हा अतिशय वेगाने वाहत चालवित होता. अपघाताच्या आधी बऱ्याच वाहनचालकाने त्याने हुलकावणी दिली होती. काही लोक सावध झाल्याने त्यांचा जीव वाचला. तर काही लोक जखमी झाले होते. बऱ्याच जणांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अतिवेगात असल्याने त्यावर नियंत्रण करणे अवघड झाले होते.  

(संपादन-प्रताप अवचार)