कुऱ्हाडीने मानेवर वार करून पत्नीचा खून, उदगीर हादरले!

crime logo.jpg
crime logo.jpg

हैबतपुर (ता. उदगीर) : येथील २८ वर्षीय विवाहितेस सेंट्रींगचे साहित्य खरेदी करण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत मानसिक व शारीरिक छळ केला. तर बुधवारी (ता.१८) पहाटे दीड वाजताच्या सुमारास आरोपी पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडी व कोयत्याने घाव घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपी पतीस ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हैबतपुर येथील मयत विवाहिता राहू राजकुमार गायकवाड (वय२८ वर्षे) हिला आरोपी पती राजकुमार लक्ष्मण गायकवाड, प्रभावती अनिल बंडे, धम्मपाली बाबासाहेब गायकवाड, अनिल बंडे, बाबासाहेब गायकवाड व आरोपी पतीची आजी यांनी संगनमत करून मयत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. आरोपी पतीच्या वडिलांच्या नावे असलेली जमीन मयत विवाहितेच्या मुलाच्या नावे करण्याच्या कारणावरून आणि सेंट्रींगचे साहित्य खरेदी करण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. 

आरोपी पतीस इतर सर्व आरोपी प्रोत्साहन देत होते. दरम्यान बुधवारी (दि.१८) मध्यरात्री पहाटे दीड वाजताच्या सुमारास आरोपी पतीने पत्नी राहूच्या मानेवर कुऱ्हाडीने व कोयत्याने घाव घालून तिचा निर्घुणपणे खून केला असल्याची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी दिल्यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

उदगीरात दरोडा, पाच आरोपीला अटक 

मंगळवारी (ता.१७) व बुधवारी (ता.१८) ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भरदिवसा साठ हजार रुपयाचा दरोडा, एक खुन व एका नायक तहसीलदारांना धक्काबुक्की केल्याच्या तीन गंभीर घटना घडल्याने उदगीर परिसर हादरला आहे. दरोड्याच्या या गुन्ह्यातील पाच आरोपींना ग्रामीण पोलिसांनी चोवीस तासाच्या आत पकडून जेरबंद केले आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, महादेववाडी (ता. देवणी) येथील शेतकरी श्री. वाडकर या शेतकऱ्याने उदगीरच्या आडत बाजारात सोयाबीन विक्री करून ६० हजार रुपयांची पट्टी घेऊन जाताना मंगळवारी (ता.१७) दुपारी चार वाजताच्या सुमारास सहा जणांनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण करून जबरदस्तीने ६० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर उदगीर ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्यातील पाच आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक केले. अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी दिली.

दरम्यान याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस निरीक्षक श्री वाघमारे यानी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे, पोलीस नाईक नामदेव सारूळे, तुळशीदास बरुरे, राहुल गायकवाड यांच्या पथकाने बुधवारी दुपारी पाच जणांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता यामध्ये नितीन एकुर्केकर, धरम कांबळे, श्याम कसबे, शरद कांबळे, महेश धावारे हे पाच आरोपी निष्पन्न झाले असून या पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री. वाघमारे यांनी दिली आहे.

नायब तहसीलदारला धक्काबुक्की

मंगळवारी (ता..१७) नायब तहसीलदार अरविंद बाबुराव महाजन तहसील कार्यालयात कर्तव्यावर होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आरोपी प्रशांत जाधव नायब तहसीलदार महाजन यांच्या कार्यालयात आला. आरोपीने शंभू उमरगा येथील श्यामराव रानबा मदने यांच्या नावाने उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठीचा अर्ज नायब तहसीलदार महाजन यांच्याकडे देऊन आजच्या आज उत्पन्नाचा दाखला द्या अशी मागणी केली. तेव्हा नायब तहसीलदार महाजन यांनी अर्जदार श्यामराव रानबा मदने यांना घेऊन या असे सांगितले. तेव्हा आरोपीने उत्पन्नाचा दाखला आजच्या द्या नाहीतर तुला काम करू देत नाही असे म्हणत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशी तक्रार नायब तहसीलदार महाजन यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्याने आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. 

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे उदगीरात

दोन दिवसात घडलेल्या तीन गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी बुधवारी (ता.१८) सायंकाळच्या सुमारास उदगीरात दाखल झाले. ग्रामीण पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाणे येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दोन दिवसात घडलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून या तिन्ही गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात आल्याने समाधान व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com