लातूर जिल्ह्यात चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा गळा कापून खून, पतीने केली आत्महत्या

गौस शेख
Thursday, 17 December 2020

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापून खून करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली आहे.

बेलकुंड (जि.लातूर) : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापून खून करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली आहे. अनुराधा महादेव पारधे (वय ४०, रा.आशिव, ता.औसा), महादेव प्रकाश पारधी (वय ४५, रा. मंगरूळ, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद) अशी मृत पत्नी व पतीची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव हा मागील तीन वर्षांपासून रोजंदारी करत पत्नी अनुराधा व तीन मुली व दोन मुलांसह आशिव (ता.औसा) येथे सासरवाडीत राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून महादेव हा अनुराधाच्या चारित्र्यावर संशय घेत सतत मारहाण करायचा. यातूनच धारदार शस्त्राने अनुराधाचा गळा कापून स्वतः महादेवने पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या लाकडी आढुला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

 

 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, सहायक पोलिस निरीक्षक संदीप भारती, पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक, बीट अंमलदार कमाल शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी भादा येथील पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारती हे करित आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband Murdered Wife Over Charactor Suspect Latur News