मदत केंद्राकडून हवी असेल तर भाजपकडे सरकार द्या, प्रीतम मुंडे यांची महाविकास आघाडीला सल्ला

उमेश वाघमारे
Monday, 30 November 2020

महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ही जनतेची निराशा पूर्ती आहे. राज्य सरकारला सर्व मदत केंद्राकडून हवी असेल तर केंद्र सरकारच्या पक्षाकडे म्हणजे भाजपकडे सरकार द्या, असा टोला भाजप प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी जालना येथे लगावत राज्यात लवकरच भाजपचे सरकार येईल असा त्यांनी विश्‍वास व्यक्त केला.

जालना : महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ही जनतेची निराशा पूर्ती आहे. राज्य सरकारला सर्व मदत केंद्राकडून हवी असेल तर केंद्र सरकारच्या पक्षाकडे म्हणजे भाजपकडे सरकार द्या, असा टोला भाजप प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी जालना येथे लगावत राज्यात लवकरच भाजपचे सरकार येईल असा त्यांनी विश्‍वास व्यक्त केला. जालना येथे राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्याच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी भाजपच्या वतीने सोमवारी (ता.३०) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी डॉ.मुंडे बोलत होत्या. यावेळी  भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत आदींची उपस्थिती होती. खासदार डॉ. मुंडे म्हणाल्या की, राज्य सरकार मागील वर्षभरात सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे. अतिवृष्टीतून  शेतकऱ्यांना दिलासा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. सत्तेत येण्यापूर्वी हेक्टर ५० हजारांच्या मदतीची मागणी करणारे सत्तेत आल्यानंतर हेक्टरी दहा हजार मदत जाहीर केली. ही मदत ही अनेक शेतकऱ्यांनी मिळाली नाही. कोविड महामारी हाताळण्यास ही हे सरकार अपयशी ठरले आहे.

केंद्र सरकारने कोविडच्या काळात  प्रत्येक जिल्ह्याला १८ ते २० लाखांचा निधी दिली. कंत्राटी आरोग्य कर्मचारी भरण्यासाठी ही केंद्राने निधी दिली. पीएम फंडातून व्हेंटीलेटर दिली. प्रत्येक बीपीएल धारकांना केंद्र सरकारने मोफत धान्य दिली. मात्र, राज्य शासनाने या काळात सामान्य माणसाला काहीच दिले नाही. तसेच महानगरात उभारण्यात आलेल्या सेंटरला विलंब झाला. त्यात पुणे येथे उभारण्यात आलेल्या सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाले. आज राज्यात तीन वर्षांच्या मुलीपासून वयोवृद्ध महिला सुरक्षित नाही.

गृहमंत्री राज्यात कायदा सुव्यवस्था आहे असे म्हणत असले तर मला राज्यात कायदा सुव्यवस्था दिसत नाही, असा आरोप ही खासदार डॉ. मुंडे यांनी केली. या राज्य सरकारने भाजपच्या पायाभूत योजनांना वर्षभर स्थगिती  देण्याचे काम केले आहे. त्यामुळे हे स्थगितीचे सरकार आहे. स्वतःचे अपयश लपविण्यासाठी राज्य सरकार केंद्राने मदत करावी अशी मागणी करत राहते. जर सर्वच मदत केंद्र सरकारकडून हवी असेल तर केंद्र सरकारच्या पक्षाकडे म्हणजे भाजपकडे राज्य सरकार द्यावे असा टोला लगावेत लवकरच राज्य भाजपची सत्ता येईल असा विश्वास खासदार डॉ. मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. या वेळी आमदार संतोष दानवे यांनी ही राज्य सरकारवर टीका करत वीजबिल माफीची ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर घुमजाव केला. नागरिकांच्या माथी भरमसाठ वीजबिल मारण्यात आले आहे. देशात सर्वाधिक महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण आहेत. हे सरकार सर्वच ठिकाणी अपयशी झाल्या आरोपी ही आमदार श्री.दानवे यांनी केली.

बबनराव लोणीकर अनुपस्थित
भाजप प्रदेश उपाध्यक्ष  खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या पत्रकार परिषदेस आमदार बबनराव लोणीकर हे उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजपचा एक गट पत्रकार परिषदेस का उपस्थित नाही? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर ही पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारच्या विसंवाद विषयी आहे, भाजपच्या विषयांचे प्रश्नवर आपण नंतर बोलू या असे म्हणत प्रदेश उपाध्यक्ष  खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी प्रश्नाला बगल दिली.
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Want Aid Then Give Power To BJP, Pritam Munde Advised To Mahavikas Aghadi