खबरदार! वाहने सुसाट पळवाल तर...

सयाजी शेळके
Thursday, 10 December 2020

विविध महामार्गावर वेगमर्यादा मोजण्यासाठी स्पीडगन यंत्रणा असलेले विशेष वाहन महामार्ग पोलिसांकडून ठेवले जात आहे

उस्मानाबाद: आता जर महामार्गावर गाडी सुसाट पळविली तर आता थेट तुमच्या मोबाईलवर अथवा आरसी बुकवर दंडाचे संदेश धडकू लागतील. विविध महामार्गावर वेगमर्यादा मोजण्यासाठी स्पीडगन यंत्रणा असलेले विशेष वाहन महामार्ग पोलिसांकडून ठेवले जात आहे. त्यामुळे महामार्गावरून गाडी पळविताना प्रत्येक वाहनचालकाला वेगाची मर्यादा पाळावी लागणार आहे.

नेहमीच खड्ड्यातून वाट काढीत जाणाऱ्या प्रत्येकाला मोठा हेवा वाटतो तो महामार्गाच्या सफाईदारपणाचा. जेव्हा कोणतीही चारचाकी मोटार राष्ट्रीय महामार्गावरून धावते, तेव्हा गतीचा अंदाज सहसा येत नाही. त्यामुळे प्रत्येक वाहनचालक ताशी १००, १२०, १४० किलोमीटर धावतो. यातूनच मोठे अपघात होतात. मुंबई-पुणे महामार्गावरही अशाच अपघाताने अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे दोघे युवक जेरबंद

दरम्यान यामध्ये वेगाने जाणारे वाहनचालक तर जीव गमवतातच पण, त्यामध्ये बसलेल्यांचा काहीच दोष नसतो. किती वेगाने घ्यायची ही त्याच्या चालकाची जबाबदारी असते. शिवाय एकदा वाहनचालक जरी वेगाने जात असला तरी त्याची झळ अन्य वाहनचालकांनाही बसते. वेगाने जाणाऱ्या भरधाव मोटारीची धडक अन्य वाहनाशी होऊन सावकाश जाणाऱ्यांनाही त्याची विनाकारण शिक्षा होते. त्यामुळे शासनाने आता वेगाने धावणाऱ्या मोटारीवर चांगलाच अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात ही सर्वांसाठी सकारात्मक बाब म्हणावी लागत आहे. जर आता तुम्ही कोणत्याही महामार्गावरून ताशी ९० किलोमीटर वेगापेक्षा मर्यादा ओलांडून जात असाल तुम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहात.

त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांना आता दंड भरावा लागत आहे. महामार्गावर काही ठरावीक अंतरावर अशा मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्यातून संबंधित वाहनाचा वेग मोजला जातो. जर वेग ताशी ९० पेक्षा जास्त असेल तर त्या वाहनाचा फोटो अक्षांश, रेखांशासह घेऊन दंडाची रक्कम मोबाईल क्रमांकावर दिली जाते. जर मोबाईल दिलेला नसेल तर ती रक्कम दंड म्हणून वाहनाच्या आरसी बुकवर जाऊन पडते. उस्मानाबाद शहरातील अशा काही नागरिकांना याचा अनुभव आला आहे. वेगाने गाडी चालविल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर दंडाचे संदेश आले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट गाडी चालविणाऱ्यांना आता वेगाची मर्यादा पाळण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

खंबाटकी (जि. सातारा) घाटात वेगमर्यादा ५० होती. ओव्हरटेक करताना ताशी ७० च्या पुढे वेग गेलो. त्यामुळे दंड बसला. हायवेची स्पीड ९० आहे. औरंगाबादहून उस्मानाबादला येत असतानाही ताशी ९० वेगमर्यादा ठेवणे अपेक्षित होते. ती १०० पर्यंत गेली. त्यामुळे दोन वेळा प्रत्येकी १००० दंड भरावा लागला. शिवाय कुठेतरी सिग्नल तोडले, त्यामुळे २०० रुपये दंड भरावा लागला. हे सर्व मला मोबाईलवर संदेश मिळाले आहेत.
- सतीश कदम, वाहनमालक

तिजोरी वजनदार-
एका वाहनाकडून १००० रुपये दंड आकारला जात आहे. महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यातील ५० वाहनांनी गतीचे नियम मोडले तरी ५० हजार होतात. राज्यात अनेक महामार्ग आहेत. अशा काही ठिकाणी जरी स्पीडगन बसविल्या तरी दररोज शासनाच्या तिजोरीत लाखो रुपये जमा होत असल्याने तिजोरीही वजनदार होत आहे.

डेप्युटी सीईओंची भटकंती थांबली, सदस्यांनी सोडवला दालनाचा प्रश्न

रात्रीही कॅमेऱ्यात कैद व्हाल-
कदाचित अनेकांना वाटत असेल की आता रात्रीची वेळ आहे, अन् आपण वेगाने जाऊ. रात्रीच्या वेळी कोण पाहणार आहे? मात्र रात्रीच्या वेळीही कॅमेऱ्यात कैद केले जाते. स्पीडगन मशीनने वेग, ठिकाण, त्या ठिकाणी काढलेले गाडीचे छायाचित्र, दंडाची रक्कम असा तपशील मोबाईलवर पाठविला जातो. त्यामुळे रात्रीही वेगाची मर्यादा पाळावी लागणार आहे.
(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if you run fast vehicles on highway will Penalty