‘सोशल डिस्टन्सिंग’चा नांदेडला फज्जा

अभय कुळकजाईकर
बुधवार, 8 एप्रिल 2020

नांदेडला कोरोनाला टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने देऊनही नागरिक ऐकत नसल्याचे चित्र आहे. जनधन योजनेतील पैसे काढण्यासाठी नागरिक बॅंकांच्या बाहेर गर्दी करत आहेत. भाजीपाला व फळे घेण्यासाठी आलेले नागरिक सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करत आहेत.

नांदेड - कोरोना विषाणूला टाळण्यासाठी घराबाहेर पडू नका आणि अत्यावश्‍यक असेल तर घराबाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तरीदेखील त्याचे उल्लंघन सर्रासपणे करण्यात येत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्यामुळे ही नांदेडकरांसाठी जमेची बाजू असली तरी अनेकजण मात्र, प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करत नसल्याचेच दिसून येत आहे. किराणा सामान, भाजीपाला व फळे घेण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक तोंडाला मास्क लावत नसल्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - सेवाभावी संस्थांचा मदतीसाठी नांदेडमध्ये पुढाकार

नियमांचे सर्रास उल्लंघन
भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी किंवा किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येत आहेत. वाडी भागात कॅनॉल रोडवर सकाळी भाजीपाला बाजारात नागरिकांची मोठी गर्दी पुन्हा होऊ लागली आहे. इतर ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये अशीच परिस्थिती आहे. अनेक नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करत ऐकत नसल्याचे चित्र आहे. 

बॅंकासमोरही होतेय गर्दी
त्याचबरोबर दुसरीकडे जनधन योजनेतील पैसे काढण्यासाठी मंगळवारी नागरिकांनी बॅंकांच्या बाहेर गर्दी केली होती. नागरिक सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या बाबत बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सूचना करूनही त्या नागरिकांनी पाळल्या नाहीत. जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाने सुरवातीपासून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. पण आता प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. पुन्हा एकदा प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाही तर पुन्हा एकदा अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तत्काळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचलेच पाहिजे - ‘स्वारातीम’ विद्यापीठात लवकरच ‘कोरोना प्रयोगशाळा’

पोलिसांचे होतेय आपतकालीन सेवेकडे दुर्लक्ष
जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी शहरात नागमोडी वळण करत रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा निश्‍चितच गर्दी कमी करण्यासाठी झाला आहे. त्याबाबत कुणाचेही दुमत नाही. पण पोलिस कर्मचारी आपतकालीन सेवेकडे दुर्लक्ष करत दुसरीकडेच लक्ष देत असल्याचे पुढे आले आहे. आरोग्य, स्वच्छता, बॅंक, शासकीय तसेच पत्रकार हे आपतकालीन सेवेतील कर्मचारी आहेत. त्यांना विनाकारण अडवले जात असून परत पाठविण्याचा किंवा रस्ता बंद करण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पोलिस अरेरावी करत दुकानदार आणि भाजीवाल्यांचीही विनाकारण अडवणूक करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ignore 'social distance' in Nanded, nanded news