कुंडलिकेच्या काठी, लावली हातभट्टी 

उमेश वाघमारे 
Friday, 24 April 2020

 कुंडलिका नदीपात्रात सुरू असलेल्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (ता.२३) छापा टाकून तब्बल एक लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात हातभट्टी दारूसह रसायन, दुचाकीचा समावेश आहे. 

जालना - तालुक्यातील तांदूळवाडी शिवारातील कुंडलिका नदीपात्रात सुरू असलेल्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (ता.२३) छापा टाकून तब्बल एक लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात हातभट्टी दारूसह रसायन, दुचाकीचा समावेश आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. मात्र, जिल्ह्यात या लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. अनेकजण चढ्या भावाने मद्यविक्री करीत आहेत.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

दरम्यान, देशी-विदेशी अवैध मद्यविक्रीसह गावठी दारू तयार करून विक्रीचा धंदाही या काळात सुरूच आहे. तालुक्यातील तांदूळवाडी शिवारातील कुंडलिका नदीपात्रात हातभट्टी दारू तयार करणे सुरू असताना गुरुवारी (ता.२३) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने येथे छापा टाकला. यावेळी एक हजार ७८० लिटर गूळमिश्रित रसायन, ११८ लिटर गावठी दारू, एक विना नंबरची दुचाकी असा एकूण एक लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री

याप्रकरणी दोन गुन्हे नोंद करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. ए. गायकवाड, दुय्यम निरीक्षक अनिल बिडकर, अभय औटे, सुनील कांबळे, विठ्ठल राठोड, संदीप डहाळे, ज्ञानेश्वर सांबरे यांनी केली. 

कैकाडी मोहल्ल्यातही कारवाई 

जालना शहरातील कैकाडी मोहल्ला येथे गुरुवारी (ता.२३) पथकाने छापा टाकून तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत; तसेच सव्वा लाखांचा मुद्देमाल नष्ट करून तीन महिलांना ताब्यात घेतले आहे.  लॉकडाउनमध्येही शहरासह जिल्ह्यातील हातभट्ट्या बंद होण्यास तयार नाही. अवैध दारूनिर्मिती करून लाकडाउनमध्ये सर्रास विक्री केली जात आहे. कदीम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कैकाडी मोहल्ला येथे गुरुवारी (ता.२३) जिल्हा दारू बंदी पथकाने छापा टाकला. यावेळी येथे सुरू असलेल्या तीन हातभट्ट्या नष्ट करण्यात आल्या. तसेच एक लाख २५ हजार ५०० रुपयांचे रसायन आणि गावठी दारू नष्ट करण्यात आली. याप्रकरणी तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संपत पवार, कर्मचारी सुभाष पवार, श्री. धुमाळ, श्री. बायस, श्री. राठोड, श्री.इंगळे, श्री.निकाळजे, महिला कर्मचारी साळवे यांनी केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal liquor seize in Jalna