भाजीपाल्याचा बनाव करीत प्रवासी वाहतूक 

प्रकाश ढमाले
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

जळगाव सपकाळ येथे भाजीपाल्याच्या विक्रीचा बनाव करीत प्रवासी वाहतूक करणारे वाहन पारध पोलिसांनी पकडले.  याप्रकरणी वाहनमालक व चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) -  भोकरदन तालुक्‍यातील अन्वा येथील वाहन शुक्रवारी (ता. १०) भाजीपाल्याच्या विक्रीचा बनाव करीत प्रवासी वाहतूक करताना पारध पोलिसांनी पकडले. ही कारवाई जळगाव सपकाळ येथे सकाळी अकरा वाजता करण्यात आली. याप्रकरणी वाहनमालक व चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. के. शिंदे गस्तीवर असताना त्यांना अन्वा ते जळगाव सपकाळ या कच्च्या रस्त्याने भोकरदन तालुक्‍यातील अन्वा येथील भाजीपाला विक्रेता वाहनातून भाजीपाल्याचा बनाव करीत प्रवासी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

उपविभागीय पोलिस अधीक्षक जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शिंदे यांनी प्रकाश सिनकर, गोपनीय शाखेचे सुरेश पडोळ, वाघ, मोरे यांच्यासह जळगाव सपकाळ येथील बसस्थानकावर सापळा रचला. त्यानंतर हे वाहन पकडले.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

या वाहनात समोर एका चालकासह वाहनमालक अशा दोन व्यक्ती आढळून आल्या. अधिक तपासणी केली असता वाहनात भाजीपाल्याऐवजी चार महिला व पाच पुरुष असे नऊ प्रवासी आढळून आले. चालक व मालकाला विचारणा केली असता त्यांनी या व्यक्तींना सिल्लोड येथून आणले, तसेच बुलडाणा जिल्ह्यात घेऊन जात असल्याची माहिती दिली. वाहनचालक शेख आरेफ शेख सलीम, वाहनमालक शेख मसूद शेख राजमहंमद (दोघे रा. अन्वा, ता. भोकरदन) या संशयितांना वाहनासह ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल समाधान वाघ यांच्या फिर्यादीवरून आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सिनकर हे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal transport of Passenger