ग्रामस्तरावर विविध उपाययोजना राबवा :‘सीईओ’ आर. बी. शर्मा

राजेश दारव्हेकर
Wednesday, 8 April 2020

येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झूम अप्लिकेशनद्वारे विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने ग्रामपंचायत स्तरावर विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना ‘सीईओ’ आर. बी. शर्मा यांनी मंगळवारी (ता. सात) झालेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.

येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झूम अप्लिकेशनद्वारे विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामपंचायत स्तरावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या सूचना शर्मा यांनी दिल्या. 

हेही वाचासिनेस्टाइल पाठलाग करून पकडला दोन लाखांचा गुटखा

स्वछताविषयक कामे करावीत

शर्मा म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळून आल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. गावातील अंतर्गत नाल्या, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी स्वछताविषयक कामे करावीत, सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या सल्ल्याने आवश्यक तेथे फवारणी करून रोगराई होणार नाही याची दक्षता घ्यावी.

जनजागृती करून दवंडी द्यावी

 गावात रोज तीन वेळा जनजागृती करून दवंडी द्यावी, दवंडी दिलेली असल्यास त्याची नोंद दवंडी रजिस्टरमध्ये घ्यावी, बाहेर जिल्ह्यातून अथवा बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीची नोंद घ्यावी, तशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात याव्यात, तसेच कोरोना संशयित असल्यास त्याचा अहवाल आरोग्य विभाकडे सादर करावा. 

ग्राम शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करावे

स्थलांतरीत लोकांचा शोध घेण्यासाठी गावपातळीवर ग्राम शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करावे, मुख्याध्यापकांनी पुनःसर्वेक्षणाचा अहवाल सादर करावा, तसेच लॉकडाउन काळात रोहयोची कामे हाती घ्यावीत, सदर कामे करीत असताना सोशल डिस्टन्स पाळावा, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी मदतनीस यांचा विमा काढण्याबाबत माहिती द्यावी, गावात सुरळीत पाणीपुरवठा करावा, आशा सूचना ‘सीईओ’ आर. बी. शर्मा यांनी दिल्या आहेत.

येथे क्लिक कराहिंगोलीत पहिल्याच दिवशी पावणे दोन लाखाची मदत

बाहेरगावांहून आलेल्या ग्रामस्थांची नोंदणी

गोरेगाव: येथे बाहेरगावांहून आलेल्या ग्रामस्थांची ग्रामपंचायतीतर्फे घरोघरी जावून नोंद घेतली जात आहे. यासाठी गावात नऊ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात अंगणवाडीताई, ग्रामंपचायत कर्मचारी, आशावर्कर, मदतनीस अशा चार सदस्यांचा पथकात समावेश आहे. प्रभाग एकमध्ये अंगणवाडीताई वर्षा खटके, ग्रामपंचायत कर्मचारी माधव कावरखे, मदतनीस गयाबाई गायकवाड, सुनंदा रसाळ यांचा समावेश आहे.

औंढा नागनाथ येथे गृहभेटीबाबत मार्गदर्शन

औंढा नागनाथ : कोरोना साथरोग संदर्भामध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतेच अंगवाडी कर्मचारी, आशा वर्कर आदींना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा विजयमाला मुळे, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, रामभाऊ मुळे, महादेव बळवंते, विजय महामुने, अनिल नागरे, सतीश रणखांबे, अविनाश चव्हाण, विष्णू रणखांबे यांच्यासह अंगणवाडीताई, मदतनीस व आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implement various measures at the village level: 'CEO' R. B. Sharma Hingoli news