जालन्यात कोरोना हॉस्पिटलचे लोकार्पण 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांसाठी सुसज्ज व सर्वसोयींनीयुक्त अशा १५० खाटांची क्षमता असलेल्या कोरोना हॉस्पिटलचे लोकार्पण आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी फीत कापून केले. 

जालना - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांसाठी सुसज्ज व सर्वसोयींनीयुक्त अशा १५० खाटांची क्षमता असलेल्या कोरोना हॉस्पिटलचे लोकार्पण शुक्रवारी (ता. २४) आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी फीत कापून केले.  यानिमित्त श्री. टोपे म्हणाले, की केवळ २९ दिवसांमध्ये उभारणी केलेल्या सुसज्ज कोरोना रुग्णालयाच्या, सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या व सर्वांच्या सहकार्याने जिल्हा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सज्ज आहे.

यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

हेही वाचा :  लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला मिळणार काम

जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे बाधित झालेले दोन रुग्ण आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, या दृष्टिकोनातून प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत; परंतु जिल्ह्यात या विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या वाढल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत, या दृष्टिकोनातून या दवाखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी १०० खाटा व ५० खाटांचा अतिदक्षता कक्ष असून, या ठिकाणी ५० व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी अनुभवी व पुरेशा प्रमाणात डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

हेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री

जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती; तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी पीपीई किट; तसेच ट्रीपल मास्क, एन- ९५ मास्कही उपलब्ध करून देण्यात आले असून गरजूंना उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या टेलिमेडिसीनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहितीही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिली. 

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात देण्यासाठी राज्यस्तरीय प्लॅनच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून अंबड येथील रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातूनही निधी मिळविण्यात येत असल्याची माहितीही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिली. श्री. टोपे यांनी कोरोना हॉस्पिटलची पाहणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Corona hospital in Jalna