esakal | प्राप्तिकर भरणारेही ‘पीएम किसान'चे लाभार्थी! खरा शेतकरी दूरच; सातारची आघाडी, अपात्रमध्ये नगर पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

0PM_20kisan_20yojana

केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान निधी (पीएम किसान) योजना अडीच वर्षांनंतर वेगळ्या वळणावर आली आहे.

प्राप्तिकर भरणारेही ‘पीएम किसान'चे लाभार्थी! खरा शेतकरी दूरच; सातारची आघाडी, अपात्रमध्ये नगर पुढे

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान निधी (पीएम किसान) योजना अडीच वर्षांनंतर वेगळ्या वळणावर आली आहे. अनेक अपात्र शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. राज्यातील तीन लाख ३७ हजार २८८ अपात्र शेतकऱ्यांकडून २५१ कोटी २१ लाख रुपये वसुली महसूल विभागाने सुरू केली आहे. यात दोन लाख ३० हजार २८२ शेतकरी प्राप्तिकर भरणारे तर एक लाख सात हजार सहा शेतकरी अन्य कारणांमुळे या योजनेसाठी अपात्र ठरले होते.

मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईने सोडला प्राण, एकाच सरणावर दोघांचे अंत्यसंस्कार


या योजनेतून शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्षांतून तीन वेळा दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. प्राप्तिकर भरणाऱ्यांसह काही घटकांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. कुटुंबांतील पती, पत्नी व १८ वर्षांखालील अपत्यांपैकी एकालाच योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र अपात्र ठरवलेली अनेक शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. प्राप्तिकर विभागाकडून यादी पडताळून घेतल्यानंतर प्राप्तिकर भरणारे शेतकरीही योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आले. त्याशिवाय एका कुटुंबांतील अनेकांच्या व मृतांच्या नावावरही लाभाची रक्कम जमा होत असल्याचे उघड झाले. अशा सर्वांना पीएम किसानची रक्कम रोख अथवा ऑनलाइन भरण्यासाठी नोटिसा बजावण्यास सुरवात केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी सांगितले.

३४ लाखांची वसुलीही
राज्यात २३ ऑक्टोबरपर्यंत ३७२ अपात्र शेतकऱ्यांकडून एक हजार ६१८ हप्त्यांची ३३ लाख ८० हजार रुपयांची वसुली केली आहे. यात प्राप्तिकर भरणाऱ्या २६४ शेतकऱ्यांकडून २४ लाख ८४ हजारांची वसुली झाली. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २५३ शेतकऱ्यांकडून २३ लाख ७२ हजार, नाशिकच्या ११ शेतकऱ्यांकडून एक लाख १२ हजार, अन्य १०८ शेतकऱ्यांकडून आठ लाख ९६ हजार रुपयांची वसुली झाली आहे.

तेलंगणा पोलिसांच्या मदतीला महाराष्ट्र पोलिस धावले, उमरग्यात सराफ लाईनमध्ये दोन तास सुरू होता गोंधळ

प्राप्तिकरवाले सर्वाधिक साताऱ्याचे
प्राप्तिकर भरणाऱ्या दोन लाख ३० हजार २८२ शेतकऱ्यांकडून त्यांनी उचललेल्या २०८ कोटी ५० लाख ९० हजार रुपयांची वसुली होणार आहे. यात सर्वाधिक १९ हजार २८९ शेतकरी सातारा जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून १७ कोटी ४४ लाखांची वसुली होईल. नगर - १९ हजार ८९०, पुणे १० हजार १०१, जळगाव - १३ हजार ९४२, सोलापूर - १३ हजार ७९३, कोल्हापूर - १३ हजार ७९१, सांगली - १३ हजार ६१, नाशिक - १२ हजार ५४ शेतकऱ्यांकडून वसुली होणार आहे. सर्वांत कमी ७७१ शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून ७४ लाखांची वसुली होईल. अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या एक ते आठ हजारांच्या आसपास आहे.

अपात्रमध्ये नगरची आघाडी
एका कुटुंबांतील अनेकांकडून लाभ, नावावर शेती नसणे व अन्य कारणांमुळे राज्यातील एक लाख सात हजार सहा शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यांनी उचललेल्या दोन लाख १३ हजार ५०५ हप्त्यांची ४२ कोटी ७० लाख दहा हजार रुपये निधीची वसुली होणार आहे. यात सर्वाधिक १९ हजार ४०१ शेतकरी नगर जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून आठ कोटी नऊ लाखांची वसुली होईल. त्यानंतर यवतमाळचा क्रमांक लागत असून आठ हजार ६०५ शेतकऱ्यांकडून चार कोटी ९५ लाखांची वसुली होईल. अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या सातशे ते चार हजारांच्या दरम्यान आहे.

संपादन - गणेश पिटेकर