esakal | जालना जिल्ह्यात एकूण १०४७ कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

मराठवाड्यात औरंगाबादनंतर आता जालना जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या एक हजार ४७ इतकी झाली आहे. दरम्यान, ५६ जणांचे अहवाल रविवारी (ता.१२) पॉझिटिव्ह प्राप्त झाले तर उपचारानंतर २१ जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

जालना जिल्ह्यात एकूण १०४७ कोरोनाबाधित

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना -  मराठवाड्यात औरंगाबादनंतर आता जालना जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या एक हजार ४७ इतकी झाली आहे. दरम्यान, ५६ जणांचे अहवाल रविवारी (ता.१२) पॉझिटिव्ह प्राप्त झाले तर उपचारानंतर २१ जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला, त्यामुळे कोरोनाबळींची संख्या आतापर्यंत ३९ झाली आहे. 

जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही जालना शहरात आहे. त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी ता. पाच जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून दहा दिवसांचे कडकडीत लॉकडाउन लागू करण्यात आले आहे.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा 

दरम्यान, जालना शहरातील बरवारगल्ली येथील ४५ वर्षीय महिलेचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेला न्युमोनियाचा त्रास होत असल्याने ता. आठ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा ता.१० जुलै रोजी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर शहरातील वाल्मीकीनगर येथील ५९ वर्षीय महिलेचा रविवारी कोरोनामुळे बळी गेला आहे. या महिलेला अस्थमा व न्युमोनियाचा त्रास होत असल्याने ता. १० जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. ही महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल रविवारी (ता.१२) प्राप्त झाला होता. दरम्यान, आतापर्यंत कोरोनामुळे ३९ जणांचे बळी गेले आहेत. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारामुळे रविवारी (ता.२१) २१ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यात बुऱ्हाणनगर येथील दहा, दानाबाजार येथील चार, अंबड येथील दोन, क्रांतीनगर, नाथबाबागल्ली, शिवनगर, रामनगर, मूर्तिवेस येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील ६१६ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

सध्या ३९२ जणांवर उपचार 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक हजार ४७ झाली असली तरी ६१६ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय येते ३६३ रुग्णांवर तर इतर ठिकाणी रेफर केलेल्या २९ रुग्णांवर अशा एकूण ३९२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात ५१५ जण संस्थात्मक अलगीकरणात 

जिल्ह्यात रविवारी (ता.१२) ५१५ जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे तीन, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ५५, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ३७, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ३८, राज्य राखीव पोलिस दल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे २१, राज्य राखीव पोलिस दल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे ९६, राज्य राखीव पोलिस दल क्वॉर्टर्स बी ब्लॉक येथे ११६, परतूर येथील केजीबीव्ही येथे १४, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ११, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २५, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १३, घनसावंगी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे आठ, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे १२, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे सात, शासकीय मुलांच्या वसतिगृहात दहा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात २२, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे एक, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे नऊजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)