सोमठाणा प्रकल्पात वाढलाय जलसाठा

आनंद इंदानी
Thursday, 6 August 2020

बदनापूर तालुक्यात पाऊस वार्षिक सरासरी गाठण्याच्या उंबरठ्यावर पोचला आहे. त्यात सोमठाणा (ता. बदनापूर) येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पात देखील पाण्याचा ओघ वेगाने सुरू असल्यामुळे दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे.

बदनापूर (जि.जालना) - तालुक्यात पाऊस वार्षिक सरासरी गाठण्याच्या उंबरठ्यावर पोचला आहे. त्यात सोमठाणा (ता. बदनापूर) येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पात देखील पाण्याचा ओघ वेगाने सुरू असल्यामुळे दुधना प्रकल्पात ११ फूट पाणी साठले आहे.

अद्याप निम्मा पावसाळा शिल्लक असल्यामुळे दुधना मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

जालना जिल्ह्यातील सोमठाणा शिवारात वर्ष १९६५ मध्ये दुधना अप्पर मध्यम प्रकल्पाची निर्मिती झाली होती. या धरणाच्या मुख्य भिंतीची लांबी २ हजार ४३० मीटर आहे. तर महत्तम उंची १७.६८ मीटर आहे. धरणाच्या सांडव्याची लांबी २९० मिटर आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास त्यात एकूण १२.३६ दशलक्ष घनमीटर जलसाठा मावतो. यापैकी उपयुक्त जलसाठा १२.०९ दशलक्ष घनमीटर आहे.

हेही वाचा : धामनाच्या सांडव्यावरून झुळझुळ पाणी 

अर्थात धरणात मोठ्या प्रमाणात गाळ व काटेरी झुडपे वाढलेली आहेत. त्याचा विपरीत परिणाम जलसाठ्यावर होत आहे. सोमठाणा धरणाखालील परिसरातील जवळपास ४४५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते. मात्र मागील काही वर्षांपासून सोमठाणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्यामुळे या धरणातील पाणी शेतीसाठी न सोडता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते. 

बदनापूरसह १५ गावांची भागते तहान 

सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पावर बदनापूर शहरासह, सोमठाणा, दुधनवाडी, गोकुळवाडी, बाजार गेवराई, वरुडी, मालेवाडी यासह औरंगाबाद तालुक्यातील काही गावांची तहान भागते. या धरणातून पाणीपुरवठा योजनेद्वारे १५ गावांना पाणीपुरवठा होतो. 

धरणात अवैध विहिरी, बोअर 

सोमठाणा येथील अप्पर मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात अनेक लोकांनी अवैध विहिरी आणि बोअर खोदून ठेवल्या आहेत. धरण कोरडे पडल्यानंतर या विहिरी व बोअरच्या माध्यमातून अवैधरित्या पाण्याचा उपसा केला जातो. अर्थात या संदर्भात अनेक तक्रारी असताना प्रशासनाकडून एखादी - दुसरी विहीर बुजवून थातुरमातुर कारवाई केली जाते. 

धरण भरण्याबाबत आशा पल्लवित 

सोमठाणा प्रकल्प मागील चार वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. त्यात यंदा जून व जुलै महिन्यातच जोरदार पाऊस झाल्याने सोमठाणा धरणाला पावसाचा आधार मिळाला. पावसाळ्याचे आणखी जवळपास दोन महिने शिल्लक असल्यामुळे यंदा सोमठाणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत सर्वांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. 

तालुका पावसाच्या सरासरीच्या उंबरठ्यावर 

बदनापूर तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाला. त्यात रोषणगाव, बदनापूर मंडळात तर अनेकदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पावसाळ्याच्या ३४ दिवसांत तालुक्यात ६७६.२० मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान ६८५ मी. मी. असून त्यामुळे पाऊस वार्षिक सरासरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मात्र धरण क्षेत्रात त्या तुलनेत जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत होती. मात्र मागील आठवड्यात औरंगाबाद तालुक्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यात भाकरवाडीचा तलाव पूर्णक्षमतेने भरून वाहत असल्यामुळे सोमठाणा प्रकल्पात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांत सोमठाणा धरणात ६० टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. सोमठाणा धरणात ३० जुलै रोजी २०.८७ टक्के जलसाठा होता. तर चारच दिवसांत ३ ऑगस्ट रोजी धरणात ४१.५१ टक्के जलसाठा झाला आहे, तर मंगळवारी (ता. चार) धरणात ५० फूट जलसाठा नोंदविण्यात आला आहे. त्यावरून सोमठाणा धरणात पाण्याचा ओघ वेगाने सुरू असल्याचे दिसून येते, अशी माहिती मोजणीदार बी. डी. गुसिंगे यांनी दिली. 

बदनापूर तालुक्याचे वैभव म्हणून सोमठाणा धरणाकडे बघितले जाते. या धरणावर १५ गावे पाण्यासाठी अवलंबून आहेत. त्यामुळे हे धरण भरल्यास परिसरातील टंचाई दूर होण्यासह सिंचनाचे प्रमाणही वाढेल. 
- पद्माकर पडूळ ,
माजी सरपंच, दुधनवाडी 

सोमठाणा धरणात यंदा ऑगस्ट महिन्यातच ६० टक्क्यांहून जास्त जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यास पाणी वाहून त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे शासनाने तातडीने धरणजोड प्रकल्प हाती घ्यावा. 
- सुनील बनकर ,
युवासेना शहरप्रमुख, बदनापूर 

 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased water storage in Somthana project