खबरदार आमच्या गावातून इंडियन ऑईलची पाईपलाइन टाकाल तर... 

Beed News
Beed News

आष्टी (बीड) : तालुक्यातील २५ गावांतून जाणाऱ्या इंडियन ऑईल गॅस कंपनीच्या पाइपलाइन कामास ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. पाइपलाइनसाठी १८ मीटर क्षेत्र संपादित करण्यात येत असून अल्पशा मोबदल्यात शेतकऱ्यांची बोळवण करण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

इंडियन ऑईल कंपनीकडून अहमदाबाद-कोहली-नगर ते सोलापूर यामार्गे पाइपलाइनचे काम सुरू असून, या कामासाठी आष्टी तालुक्यातील कोयाळ, खुंटेफळ, सुंबेवाडी, पिंपळा, धनगरवाडी, नांदूर, बाळेवाडी, धानोरा, साबलखेड, चिंचोली, कडा, शेरी खुर्द, शेरी बुद्रुक, चोभानिमगाव, वटणवाडी, जळगाव, पिंप्री आष्टी, मुर्शदपूर, आष्टी, पोखरी, गांधनवाडी, चिंचपूर, भातोडी, खाकाळवाडी व पांढरी या २५ गावांतील ३७७ गटांतील सुमारे १०३ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आलेले आहे. 

यासाठी कंपनीने शेतकऱ्यांना प्रतिगुंठा काही ठिकाणी दोन हजार ९६० रुपये, तर काही ठिकाणी चार हजार ८०० रुपयांपर्यंत अल्पसा मोबदला देण्यात येत आहे. प्रकल्पासाठी बागायती व जिरायती अशी जमिनीची वर्गवारी करण्यात आलेली नसून सरसकट एकाच पद्धतीने मोबदला दिला जात असून, प्रकल्पासाठी जमिनी पूर्णपणे संपादित न करता पाइपलाइनसाठी खोदकाम करून पाइप गाडण्यात आल्यानंतर ते क्षेत्र शेतकऱ्यांना पुन्हा वापरण्यासाठी देण्यात येईल, असे जरी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे.

मात्र, या जमिनीचा भविष्यात कोणताही उपयोग शेतकऱ्यांना होणार नसल्याचे व कंपनीकडून त्यांची लूट सुरू असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सध्या तालुक्यातील पिंपळा, कुंटेफळ, पिंपळा, नांदूर, बाळेवाडी, धानोरा येथे कंपनीकडून खोदकाम व पाइप गाडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोबदल्याचे धनादेश दिल्यानंतरच काम करण्यात येत आहे. मात्र, मिळालेला मोबदला अत्यल्प आहे. त्यामुळे कामास शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. संपादित क्षेत्राचा जास्तीचा मोबदला देण्यात यावा, अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

कंपनीकडून बळाचा वापर

दरम्यान, काम करतेवेळी शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांची, तसेच रस्त्यांची कंपनीकडून नासधूस करण्याचे काम सुरू आहे. या कामास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बळाचा वापर सुरू असून गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com