दाट धुक्यामुळे हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव 

विठ्ठल देशमुख
Sunday, 20 December 2020

सध्या सतत बदलत्या हवामानामुळे शेतातील रब्बी पिके धोक्यात आली आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला अतीवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, उडीद, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

सेनगाव, (जि. हिंगोली) - सेनगाव तालुक्यात सध्या सकाळी पडत असलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाचे मात्र अद्याप शेतकऱ्यांकडे लक्ष गेले नसून कुठलेही मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे तत्काळ कृषि विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सध्या सतत बदलत्या हवामानामुळे शेतातील रब्बी पिके धोक्यात आली आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला अतीवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, उडीद, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना कामातील कामचुकारपणा भोवणार 

रब्बी पिके धोक्यात 
गेल्या अनेक दिवसांपासून सेनगाव तालुक्यामध्ये दिवसभर तापमानात वाढ होऊन रात्रीच्या वेळी कधी थंडी पडत आहे. तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. आणि सकाळी दाट धुके सुध्दा पडताना दिसून येत आहे. या बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होताना पहायला मिळत आहे. त्यामध्ये हरभरा, तूर आदी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होऊन हरभरा पिकांवरील फुले सुध्दा गळून पडत आहेत. तसेच काही ठिकाणी हरभऱ्यांची पिके करपुन जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेऊन पिकवलेले पिक जाण्याच्या मार्गावर आहे.
 
कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज 
हरभरा व तुर पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. यापूर्वी सोयाबीन, उडीद, मुग हाताशी आलेल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून कमालीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु ही पिके वाचविण्यास त्यांना अपयश आले. आता मात्र आशा होती की, हरभरा आणि तुर पिके तरी आपला आर्थिक बोजा कमी करण्यासाठी मदत करेल. पण सततच्या बदलत्या हवामानामुळे रब्बी पिके पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : दामिनी पथकाकडून गांजा जप्तीची कामगिरी, ग्रामीणचे गुन्हे शोध पथक तोंडघशी 
 
दाट धुक्यामुळे परिणाम

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील हाताशी आलेले सोयाबीन, मुग, उडीद पिके नष्ट झाली आहेत. आता आशा होती की, हरभरा आणि तुर पिक तरी साथ देईल. पण तुरीनंतर सकाळी पडत असलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकांची फुले गळून पडत आहेत. तर काही ठिकाणी पूर्ण झाडे करपुन जात आहेत. 
- विष्णु मुरकुटे, शेतकरी, कडोळी. 

संपादन - अभय कुळकजाईकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infestation of larvae on gram crops due to dense fog, Hingoli news