अशा संचारबंदीत भटकंती सूचतेच कशी   

आनंद इंदानी
गुरुवार, 26 मार्च 2020

पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाने पोटतिडकीने आवाहन करूनही काही नागरिक अगदी काहीच झाले नाही, अशा आविर्भावात बाहेर फिरत आहेत. काही लोक घोळक्याने ओट्यावर बसून गप्पा मारत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. अशा बेजबाबदार लोकांमुळे इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्यांना कायद्याचा धाक असणे गरजेचे झाले आहे.

बदनापूर, ता. २६ :कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की संचारबंदी  लागते. सध्याची संचारबंदी माणसे जगविण्यासाठी आहे. ही स्थिती समजून न घेता बेजबाबदार नागरिकांची भटकंती कायम आहे. 

कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होण्याचा धोका वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. मात्र बदनापूर शहरात संचारबंदी ही केवळ दुकानबंदीपुरतीच मर्यादित असल्याचे चित्र गुरूवारी (ता. २६) दिसून आले.

हेही वाचा :  रिकामचोटांना बसतायत फटके

पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाने पोटतिडकीने आवाहन करूनही काही नागरिक अगदी काहीच झाले नाही, अशा आविर्भावात बाहेर फिरत आहेत. काही लोक घोळक्याने ओट्यावर बसून गप्पा मारत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. अशा बेजबाबदार लोकांमुळे इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्यांना कायद्याचा धाक असणे गरजेचे झाले आहे, अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले, मात्र अद्याप अनेक लोकांना परिस्थितीचे गांभीर्य कळालेले नाही. त्यामुळे कठोर कारवाईची गरज आहे. 

राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून घरातच बसावे. बाहेर फिरल्याने संसर्ग वाढू शकतो. अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराच्या बाहेर फिरू नये. अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसमोर आखण्यात आलेल्या मार्किंगवर उभे राहूनच साहित्य खरेदी करावे. अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा. 
- पांडुरंग जऱ्हाड 
व्यापारी, बदनापूर

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. त्यात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्यामुळे कुणाचीही गैरसोय होणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून नव्हे, तर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे कुणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. आपण घरात थांबल्यास आपल्यासह आपले कुटुंब कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहील. विनाकारण बाहेर फिरल्यास पोलिसांना नाइलाजास्तव कारवाई करावी लागेल. 
- मारुती खेडकर 
पोलिस निरीक्षक, बदनापूर 

कोरोना विषाणूचा संसर्ग तिसऱ्या टप्प्यात पोचणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. शासन आणि आरोग्य विभागाने सुचविलेल्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी घरात थांबून कोरोना विषाणूंचा प्रतिकार करावा. अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेल्यास सोशल डिस्टन्स ठेवावे, घरातही अंतर ठेवावे. 
- डॉ. ओम ढाकणे 
वैद्यकीय अधिकारी, बदनापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irresponsible people brakes a curfew